Tuesday, September 17, 2024
Homeनगरबंद घर फोडून 11 तोळे सोने, तीन किलो चांदी लंपास

बंद घर फोडून 11 तोळे सोने, तीन किलो चांदी लंपास

बोरूडे मळ्यातील घटना || तोफखाना पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

बंद घर फोडून सुमारे साडे अकरा तोळ्याचे सोन्याचे दागिने, तीन किलो चांदी व 20 हजाराची रोकड असा तीन लाख 35 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. बोरूडे मळ्यातील पंचशीलनगरच्या उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये शनिवारी (31 ऑगस्ट) रात्री नऊ ते रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी योगेश भीमराव नेवसे (वय 37) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी नोकरीनिमित्त मांजरी (जि. पुणे) येथे राहतात. त्यांचे नगर मधील पंचशीलनगरच्या उत्कर्ष अपार्टमेंटमधील घरी त्यांची आई सुनीता अधून मधून येत असतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांची मावशी अजिता धाडगे राहते. फिर्यादीची आई सुनीता शनिवारी रात्री नऊ वाजता त्यांचे घर बंद करून बहिण अजिता धाडगे यांच्याकडे गेल्या होत्या. त्या रविवारी सकाळी सात वाजता घरी आल्या असता त्यांना मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले. त्यांनी फिर्यादीला माहिती दिली.

फिर्यादी पुणे येथून आल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता सामानाची उचकापाचक झालेली दिसली. घरातील सहा तोळ्याच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, चार तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस हार, पाच ग्रॅमचे सोन्याचे झुमके, तीन किलो चांदीच्या भांड्याचा सेट व 20 हजारांची रोकड असा तीन लाख 35 हजारांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यू. एन. राजपूत करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या