Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभरदिवसा घरफोडी; पाठलाग करून चोरट्याला पकडले

भरदिवसा घरफोडी; पाठलाग करून चोरट्याला पकडले

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

तालुक्यातील जायगाव परिसरात महादेव मंदिराजवळ भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली. घराला कुलूप लावून शेतात गेलेल्या कुटुंबाच्या घरात घुसून कपाट फोडत दागिने चोरणाऱ्या संशयिताला नातेवाईकांनी पाठलाग करून पकडत चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले.

जायगाव येथील रहिवासी सोमनाथ पांडुरंग आव्हाड हे घराला कुलूप लावून गावातील शेतात कोबी लागवडीच्या कामासाठी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरून तो पसार होण्याच्या तयारीत होता. दरम्यान, सोमनाथ आव्हाड यांचे पुतणे अजय आव्हाड हे कंपनीतील काम आटोपून घरी परतत असताना त्यांना घराच्या गेटवरून एक संशयित व्यक्ती उडी मारून बाहेर पळताना दिसली.

संशय आल्याने अजय यांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर पाठलाग करून त्यांनी संबंधित व्यक्तीला पकडून विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. पकडलेल्या संशयिताकडून चोरीतील काही दागिने हस्तगत करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी चोरट्याला चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. चोरट्याकडे असलेली मोटरसायकलही चोरीची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून त्याबाबत तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे जायगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : शाळेच्या बसला अपघात

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पडसाद मूकबधिर विद्यालयाच्या बसचे अचानक ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने शनिवारी (दि. १२) दुपारी पंचवटीतील गोदाघाट परिसरात अपघात झाला. चालक...