अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घराला कुलूप लावून पत्नीच्या उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि 88 हजार रूपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बोल्हेगाव येथील श्रीराम चौक परिसरात घडली. मंगळवारी (3 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी रवींद्र बाबासाहेब ढाकणे (वय 33, रा. श्रीराम चौक, भारत बेकरी परिसर, बोल्हेगाव) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ढाकणे हे वाहनचालक म्हणून काम करतात. ते पत्नी, दोन मुले यांच्यासह बोल्हेगाव येथील श्रीराम चौक परिसरात भाड्याच्या घरात राहतात. मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीची तब्येत बरी नसल्याने ढाकणे हे पत्नी आणि दोन्ही मुलांसह घराला कुलूप लावून उपचारासाठी दवाखान्यात गेले होते. दुपारी सुमारे 4 वाजता उपचार घेऊन कुटुंब घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. दरवाजाला लावलेले कुलूप तसेच कडी-कोंडा तुटलेल्या अवस्थेत होते. घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यानंतर त्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी फिंगरप्रिंट पथकाला पाचारण केले.
पथकाने तपासणी केल्यानंतर ढाकणे यांनी कपाटाची पाहणी केली असता लॉकर तुटलेला आढळला. लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी सोन्याची 25 ग्रॅम वजनाची चैन, 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाचा नेकलेस, पाच ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, तसेच 4.8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि 88 हजार रूपये रोख असा एकूण 1 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.




