Friday, May 3, 2024
Homeधुळेशिरपूरात ट्रकसह 11 लाखांची भांग जप्त

शिरपूरात ट्रकसह 11 लाखांची भांग जप्त

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूर शहरातील अरूणावती नदी किनारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ट्रकसह 11 लाख 20 हजार रूपये किंमतीची सुकी भांग जप्त केली.

- Advertisement -

आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांविरूध्द शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील अरुणावती नदी किनारी शनिमंदिराचे पाठीमागे मोकळ्या जागेत पिंटू शिरसाठ याच्या मालकीचे आयशरमध्ये (क्र. एम.एच. 18, ए.ए. 8349) मध्ये सुका भांग बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवला असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथे आयशरसह सतिष मनोहर मोरे (रा. शिरपूर) हा मिळून आला.

चौकशीत त्याने आयशर हा पिंटू शिरसाठ याच्या मालकीचा असून त्यातील गोण्या पिंटू शिरसाठ, सतिष मनोहर मोरे दोघे (रा. शिरपूर) व दीपक बाबुराव कुरे व पप्पू टापसे दोघे (रा.धुळे) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले.

आयशरमध्ये एकूण 160 कोरड्या भांगेने भरलेल्या गोण्या मिळून आल्या. त्याची किंमत 7 लाख 20 हजार रूपये व चार लाखांचा आयशर असा एकूण 11 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वरील तिघांंविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोहेकॉ रफीक पठाण, पोना गौतम सपकाळे, पोकॉ राहुल सानप, किशोर पाटील, योगेश जगताप व विलास पाटील यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या