अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी परिसरातील एस. के. एंटरप्रायजेस येथे पार्क केलेल्या कारची डाव्या बाजूच्या पुढील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील एक लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (3 नोव्हेंबर) दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी योगेश संपतराव कातोरे (वय 32, रा. कातोरे वस्ती, एमआयडीसी, अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कातोरे यांची हॅरिअर कार (एमएच 16 सीव्ही 7383) एमआयडीसीतील ब्लॉक क्रमांक एफ-26 येथील एस. के. एंटरप्रायजेससमोर पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने कारच्या डाव्या बाजूच्या पुढील दरवाजाची काच फोडली. त्यानंतर कारमध्ये ठेवलेली 500 रूपयांच्या नोटांच्या स्वरूपातील एक लाख रूपयांची रोकड चोरून नेली. सायंकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कातोरे यांनी पोलिसांत धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील केडगाव परिसरातील हॉटेल स्वीट होम येथे नाश्त्यासाठी थांबलेल्या महिलेच्या कारची काच फोडून चोरट्याने सुमारे 73 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी (2 नोव्हेंबर) घडली होती. त्यानंतर दुसर्याच दिवशी एमआयडीसीत देखील अशीच घटना घडल्यामुळे कारची कार फोडून चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.




