Saturday, May 4, 2024
Homeनगरविवाहिता मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करा

विवाहिता मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून तिला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले असल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत विवाहितेचे वडिल, भाऊ यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील खरवंडीचे सोपान भोगे यांची मुलगी कोमल हिचा मे 2017 मध्ये नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील रमेश जाधव याच्यासोबत विवाह झाला होता. पती रमेश, सासरा बाळासाहेब जाधव व सासू सुनीता जाधव यांनी पैशासाठी छळ केल्याने कोमलने आत्महत्या केल्याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासर्‍याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, सासरच्या लोकांनी कोमलला मारहाण करून विहिरीत टाकले असल्याचा आरोप मयत कोमलचे वडिल सोपान भोगे, भाऊ अरूण भोगे, प्रभाकर भोगे यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांची भेट घेऊन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.

कोमल हिच्या शरिरावर ठिक-ठिकाणी मारहाणीच्या खुणा दिसून आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. आरोपी व कोमल एकाच घरात राहत होते. तसेच कोमल हिचा मृत्यू रात्रीच्यावेळी झाला आहे. वस्तुस्थिती व परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपी यांनी कोमलला मारहाण करून विहिरीत टाकून दिले असल्याचे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आरोपीच्या अटकेस टाळाटाळ

कोमल हिचा मृत्यू 9 ऑगस्ट रोजी झाल्यानंतर तिचा पती रमेश, सासरे बाळासाहेब जाधव व सासू सुनीता जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोमलचे वडिल सोपान भोगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फक्त पती रमेशला अटक केली आहे. दरम्यान सासरे बाळासाहेब, सासू सुनीता यांना पोलिसांनी अटक केली नसून त्यांना अटक करावी, अशी मागणीही वडिल सोपान भोगे यांनी अधीक्षक पाटील यांच्याकडे केली आहे. अधीक्षक पाटील यांनी तात्काळ दखल घेत पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांना दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या