नवी दिल्ली | New Delhi
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिले होते. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले तर पाकिस्तानात हवाई तळ उध्द्वस्त केले. पण, ऑपरेशन सिंदूर शिगेला पोहचले असताना १० मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक शस्त्रसंधीची घोषणा झाली. या निर्णयाने जगभरता आश्चर्य व्यक्त करण्यात आले. जनतेच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की इतक्या लवकर हा निर्णय का घेण्यात आला? आता याबद्दल भारताचे सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले सीडीएस अनिल चौहान?
भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी सिंगापूर येथील शांगरी-ला डायलॉगमध्ये शस्त्रसंधीचे नेमके कारण सांगितले. ते म्हणाले की, भारताने आपल्या रणनीतीनुसार हे पाऊल उचलले आहे. भारताने तीन दिवसांमध्येच आपले सर्व लक्ष्य साध्य केले होते. त्यामुळे लष्करी कारवाई थांबवणे ही योग्य रणनीती होती.
ऑपरेशन सिंदूर ६-७ मे रोजी रात्री झाले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. त्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता अब्दुल रऊफ अझहर याचाही समावेश आहे. भारतीय सैन्याच्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण प्रणालीस नुकसान पोहचले. पाकिस्तानच्या स्कर्दू, जैकबाबाद, सरगोधा आणि भोलारी सारख्या हवाई तळाचे मोठे नुकसान झाले. १० मे रोजी सकाळी भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हल्ले केले. त्यात पाकिस्तानच्या नूर खान-चकलाला विमानतळाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिकही ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. तो भारताने स्वीकारला.
सीडीएस जनरल अनिल चौहान पुढे म्हणाले की, भारताने या संपूर्ण मोहिमेदरम्यान, पूर्णपणे स्पष्टता आणि स्वायत्ततेसोबत काम केले. त्यांनी सांगितले की, भारताने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर दीर्घ धोरण अवलंबले होते. त्यावेळी पाकिस्तान प्रत्येक बाबतीत भारताच्या पुढे होता. मात्र आज भारत आर्थिक, सामाजिक आणि मानव विकासाच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे गेला आहे. हा धोरणात्मकतेचाच परिणाम आहे.
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये सांगितले की, भारताने पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानकडून नेहमी शत्रूत्व मिळाले. त्यामुळे लांब राहणेच योग्य आहे. आता भारतच बदलला नाही तर भारताचे धोरणसुद्धा बदलले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




