Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमCrime News : झोपेत असताना पतीची कुर्‍हाडीने हत्या

Crime News : झोपेत असताना पतीची कुर्‍हाडीने हत्या

पत्नीवरही जीवघेणा हल्ला || कल्याण रस्ता परिसरातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावरील जाधव मळा परिसरात अज्ञात व्यक्तीने झोपेत असलेल्या दाम्पत्यावर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (16 जून) पहाटे घडली. या हल्ल्यात लक्ष्मण मार्तंड काळे (वय 30, मुळ रा. काळेगाव, अमरापुर, ता. शेवगाव, हल्ली रा. जाधव मळा, कल्याण रस्ता) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी रूपाली काळे (वय 28) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खुन व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रूपाली काळे यांचा भाऊ प्रशांत सयाजी भोसले यांचे विळदघाट येथील गायरान जमिनीच्या वादावरून काही व्यक्तींशी वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रूपाली काळे, त्यांचे पती लक्ष्मण काळे व दोन मुले हे प्रशांत भोसले यांच्या मदतीसाठी जाधव मळा येथील त्यांच्या घरी आले होते. याच जमिनीच्या वादातून संबंधित काही व्यक्तींविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. सोमवारी (15 जून) रात्री सर्वांनी एकत्र जेवण केल्यानंतर घरातील जागा कमी असल्याने रूपाली काळे, त्यांचे पती लक्ष्मण काळे आणि दोन्ही मुले घराबाहेरील व्हरांड्यात झोपले होते. तर प्रशांत भोसले, त्यांची पत्नी आणि मुले घरात झोपली होती.

मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रूपाली काळे यांना तहान लागल्याने त्या पतीला उठविण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र ते प्रतिसाद देत नव्हते. त्याचवेळी मुलांनी बाबा गेला असा आक्रोश केल्याने भाचा नेहल भोसले बाहेर आला. त्याने लक्ष्मण काळे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून आरडाओरडा केला. त्यानंतर प्रशांत भोसले व त्यांच्या पत्नीने बाहेर येऊन पाहिले असता लक्ष्मण काळे यांच्या डोक्यात कुर्‍हाड खुपसलेली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. या हल्ल्यात रूपाली काळे यांच्या चेहर्‍यावरही वार झाल्याने त्या जखमी झाल्या होत्या. दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी डॉक्टरांनी लक्ष्मण काळे यांना मृत घोषित केले.

संशयितांकडे चौकशी सुरू
रूपाली काळे यांच्या फिर्यादीवरून, सोमवारी रात्री 11 ते मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून लक्ष्मण काळे यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून त्यांची हत्या केली तसेच रूपाली काळे यांच्यावरही जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, जमीन वादाच्या पार्श्वभूमीवरही पोलीस तपास करत आहेत. काही संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...