Wednesday, June 17, 2026
HomeनगरDeolali Pravara : पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा हवालदिल

Deolali Pravara : पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा हवालदिल

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

जून महिन्याचा पंधरवडा उलटून गेला तरी परिसरात पावसाचा एकही थेंब न पडल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत आकाशात ढगांची गर्दी होत असली तरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार्‍या जोरदार वार्‍यांमुळे हे ढग विरून जात आहेत. परिणामी आभाळ पुन्हा स्वच्छ होत असून 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानाचा उष्मा कायम आहे. या परिस्थितीमुळे दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

मागील वर्षी 22 व 25 मे रोजी रोहिणी नक्षत्राचा चांगला पाऊस झाला होता. त्या पावसाच्या आधारे सोयाबीन पेरणी आणि कापूस लागवडीला सुरुवात झाली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रानेही हजेरी लावली होती. मात्र यंदा परिस्थिती पूर्णतः उलट आहे. मे महिन्याच्या अखेरीस काही भागांत अवकाळी स्वरूपाचा किरकोळ पाऊस झाला; परंतु त्यातही पावसापेक्षा वादळाचा प्रभाव अधिक होता. हवामान विभागाने यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, धरणांतील जलसाठा घटला असून विहिरी व कूपनलिकांनीही तळ गाठला आहे. त्यामुळे लवकरच दमदार पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या मेहनतीने शेतजमिनीची मशागत करून ठेवली आहे.

पठारी भागातील जिरायती क्षेत्रात नांगरणी, वखरणी व कुळवाच्या पाळ्या घालून मटकी, उडीद, हुलगे, बाजरी, भुईमूग, मका आदी पिकांसाठी जमीन तयार करण्यात आली आहे. मात्र पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून शेतकर्‍यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. बागायती भागाची परिस्थितीदेखील फारशी वेगळी नाही. अनेक ठिकाणी शेतजमीन तयार असूनही सोयाबीनची पेरणी झालेली नाही. काही मोजक्या शेतकर्‍यांनी कापूस लागवड केली असली तरी ती टिकवण्यासाठी अतिरिक्त पाणी आणि फवारण्यांवर खर्च करावा लागत आहे. प्रचंड उष्णता आणि कोरडे वारे यामुळे आज पाणी दिलेले पीक दुसर्‍या दिवशी कोमेजल्याचे चित्र दिसत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकर्‍यांनी बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र पावसाअभावी ही सामग्री घरातच पडून आहे.

पाऊस आणखी लांबल्यास बियाणे व खतांवरील मोठी गुंतवणूक अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांपुढे नव्या संकटाचे सावट उभे ठाकले आहे. याशिवाय शेतीसाठीच्या वीजपुरवठ्यात झालेली कपातही शेतकर्‍यांच्या चिंतेत भर घालत आहे. आठ तासांवरून सहा तासांपर्यंत वीजपुरवठा कमी करण्यात आला असून त्यातही सुमारे दीड तास भारनियमन होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात साडेचार तासच वीज उपलब्ध होत असल्याने ऊसासह इतर पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण झाले आहे. प्रचंड तापमान, कोरडे वारे आणि पावसाची लांबलेली प्रतीक्षा यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटून आले असून दुष्काळाच्या सावटाने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

संकटांची मालिका; शेतकरी अडचणीत
इथेनॉल धोरणामुळे उसाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा असतानाच साखर, कांदा आणि गहू निर्यातीवरील निर्बंधांचा परिणाम शेतकर्‍यांवर झाला आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून दूधदरात झालेल्या घसरणीमुळे दुग्धव्यवसायही तोट्यात गेला आहे. कर्जमाफीच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत आता दुष्काळाच्या संभाव्य संकटाने शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...