Sunday, May 5, 2024
Homeनाशिकगणेशोत्सव शासनाच्या नियमातच साजरा करा

गणेशोत्सव शासनाच्या नियमातच साजरा करा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे-बसस्थानक, रिक्षा स्थानक, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आदी सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. आगामी गणेशोत्सव सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायजर, थर्मल स्कॅनरचा वापर अशा नियमात होणार आहे. सर्व मंडळे व नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजीत मंडळे तसेच पोलीसांच्या आढावा बैठकीत भुबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले, कोरोनाचा धोका कायम असल्याने सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधी झालेले सन उत्सव आपण गर्दी न करता साजरे केले. त्या प्रमाणेच गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे. एकाच ठिकाणी विसर्जन न करता कृत्रिम तलाव तयार करून विसर्जन करता येईल का याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.

सध्या जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट असल्याने पाणी कापतीचा निर्णय घ्यावा लागू शकतो. हीच परिस्थिती कायम राहिल्यास विसर्जनादरम्यान पाण्याचे नियोजन करावे, तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोनापासून खबरदारी कशी घ्यावी याचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन ना. भुजबळ यांनी केले.

यावेळी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे तसेच शहरातील प्रमुख गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत गणपती महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक शाहू खैरे, शरद आहेर,रामसिंग बावरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अशा असतील अटी

* सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ७ दिवस आधी ऑनलाइन परवानगी मिळणार आहे.

* गणेशमूूर्ती विक्रीसाठी शहरातील मैदानांवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून स्टॉल उभारण्यास परवानगी

* प्रत्येक मंडळाच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग, मास्क वापरणे अनिवार्य राहणार आहे.

* सार्वजनिक मंडळांसाठी चार फुट उंचीपर्यंत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करता येणार आहे.

* घरातील गणेशमूर्तीची उंची दोन फूटापर्यंत असेल.

* आरतीसाठी आणि गणेश विसर्जनासाठी कमीत कमी लोक उपस्थित राहतील.

* रेल्वे, बसस्थानक, रिक्षा स्थानक, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आदी गर्दीच्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नसेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या