Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआदिवासी कला-संस्कृतीचा नाशिकमध्ये जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ला प्रारंभ

आदिवासी कला-संस्कृतीचा नाशिकमध्ये जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ला प्रारंभ

पावरी, तारपा, बोहाडासह पारंपरिक कलांचे सादरीकरण

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या नाशिक विभागीय प्रादेशिक फेरीला शनिवारी (१ नोव्हेंबर) उत्साहात सुरुवात झाली. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात नाशिक विभागातील ५ जिल्हे आणि २३ तालुक्यांतील तब्बल ८१२ कलाकारांनी सहभाग घेतला.

कलाकार आणि रसिकांसह १ हजारांहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला. नाशिक विभाग हा आदिवासीबहुल भाग असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोकणा, महादेव कोळी, ठाकूर, भिल्ल, पावरा यांसह विविध आदिवासी जमातींच्या कलाकारांनी आपल्या पारंपरिक कला सादर करत सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविले. या प्रादेशिक फेरीत बोहाडा, ढोल आणि होळी नृत्याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. प्राचीन आख्यायिका आणि आदिवासी जीवनाशी निगडित प्रसंग नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. पावरी, डाक, तारपा यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी वातावरण भारून गेले. होळी गीत, भिल्ल गीत आणि लग्नगीतांच्या सादरीकरणातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे अस्सल प्रतिबिंब उमटले.

हस्तकला प्रदर्शनात पारंपरिक मुखवटे, बांबू व लाकडापासून तयार केलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. तर चित्रकला विभागात वारली, गोंडी आणि भिल्ल चित्रशैलीतून आदिवासी जीवन, निसर्ग आणि परंपरांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. राज्यस्तरीय महाअंतिम फेरीकडे लक्ष ‘भगवान बिरसा कला संगम’ अंतर्गत यशोदीप बहुउद्देशीय सर्वांगीण विकास संस्था, आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था आणि सूर्यदर्शन कै. मोहन दादा वळवी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रादेशिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (TRTI) आयुक्त निलेश सागर, आदिवासी विकास विभागाचे नाशिक अपर आयुक्त दिनकर पावरा यांची उपस्थिती लाभली. आयोजक संस्थांच्या वतीने गिरीश गावित, ईश्वर गावित आणि संदीप वळवी यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेतील गुणवत्तेनुसार प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना २ हजार ५०० ते २५ हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय दोन कलाकारांना उत्तेजनार्थ विशेष बक्षिसे देण्यात येणार असून, सर्व सहभागी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नाशिक विभागीय फेरीतून निवड झालेले कलाकार आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी नाशिकसह अमरावती आणि नागपूर येथेही प्रादेशिक फेऱ्या एकाचवेळी होत आहेत. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस आणि भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गडचिरोली येथे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय महाअंतिम सोहळा होणार आहे.”

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तुळशी गावाला शरद पवारांचा मोठा दिलासा; ५० लाखांचा दिला धनादेश

0
माढा : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाला...