Saturday, May 30, 2026
HomeनगरAhilyanagar : जनगणनेला ‘कौटुंबिक कारणांचे’ ग्रहण!

Ahilyanagar : जनगणनेला ‘कौटुंबिक कारणांचे’ ग्रहण!

अहिल्यानगरमध्ये 250 प्रगणकांची ड्युटीतून माघार घेण्याची विनंती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या जनगणनेच्या कामास आता ‘कौटुंबिक कारणांचे’ ग्रहण लागल्याचे चित्र अहिल्यानगर शहरात दिसून येत आहे. जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे 250 प्रगणक व पर्यवेक्षकांनी विविध वैयक्तिक अडचणींचे कारण पुढे करत हे काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. याबाबत संबंधितांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे विनंती अर्ज सादर केले असून, त्यामुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

अहिल्यानगर शहरात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय स्तरावरील जनगणना प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी सुमारे 750 प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक, महापालिका शाळांतील शिक्षक, महापालिका कर्मचारी तसेच खासगी शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे. 1 मे पासून शहरात स्व-जनगणना तसेच प्रत्यक्ष माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जात असतानाही तब्बल 250 कर्मचार्‍यांनी या ड्युटीतून सूट देण्याची मागणी केली आहे.

अर्जांमध्ये आई-वडिलांचे आजारपण, मुला-मुलींचे विवाह, हात-पायांवरील शस्त्रक्रिया, बीपी, मधुमेह, हृदयविकार आदी कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी जनगणनेच्या जबाबदारीपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने अद्याप कोणाचाही विनंती अर्ज मंजूर केलेला नाही. संबंधित कर्मचार्‍यांनी दिलेल्या कारणांची पडताळणी करण्यात येणार असून, विनाकारण जनगणनेचे काम टाळण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नियोजनावर परिणाम
एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांनी माघार घेण्याची भूमिका घेतल्यामुळे जनगणनेच्या सूक्ष्म नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका प्रगणकावर सरासरी 150 कुटुंबांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे 250 प्रगणक कमी झाल्यास हजारो कुटुंबांची माहिती वेळेत नोंदविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहणार आहे.

नवीन नियुक्तीचे आव्हान
जर मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजूर झाले, तर प्रशासनाला तातडीने नवीन प्रगणकांची नियुक्ती करावी लागणार आहे. नव्याने नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात कामासाठी तयार करणे आणि संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे निश्चित मुदतीत जनगणना पूर्ण होईल का, याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...