अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने किमान हमी खरेदी दर प्रतिक्विंटल 1 हजार 580 रुपये निश्चित केला असून, हा दर 26 मे 2026 पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने हे दर जाहिर केल्याने आता खुल्या बाजारातील व्यापार्यांना या दरापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करता येणार नाही. परिणामी कांदा दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत ग्राहक व्यवहार विभागाच्या कॉस्टिंग सेलने यासंदर्भातील कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे. आतापर्यंत 1235 प्रति क्विंटल दराने सरकार शेतकर्यांचा कांदा खरेदी करीत होते. आजपासून ’सदर आदेशानुसार रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी नाफेड व एनसीसीएफमार्फत हमी दराने खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
अनेक शेतकर्यांना कांदा साठवणूक करूनही अपेक्षित दर मिळत नव्हते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला मॅप दर कांदा उत्पादकांसाठी काही प्रमाणात आधार देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांकडून कांद्याला किमान 2 हजार रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.




