Sunday, September 13, 2026
Homeक्राईमShrirampur : बंदूकीतून फायर करून चोरट्यांना पिटाळले

Shrirampur : बंदूकीतून फायर करून चोरट्यांना पिटाळले

बेलापूर परिसरात सलग तिसर्‍या दिवशी संशयित चोरट्यांचा वावर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बेलापूर-उक्कलगाव रोडवरील वाबळे वस्तीवर सहा संशयित इसम चोरीच्या उद्देशाने सहा चोरटे दबा धरून बसले असल्याचे लक्षात येताच एका शेतकर्‍याने परवानाधारक बंदूकीतून फायर करून त्यांना पळवून लावल्याची घटना काल सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील बेलापूरसह प्रवरा नदीकाठच्या परिसरात सलग तीन दिवसांपासून संशयित चोरट्यांच्या हालचालींनी नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी आकाशात फिरणारे ड्रोन, दुचाकी व चारचाकींमधून फिरणारे अनोळखी इसम आणि वस्त्यांवर दबा धरून बसल्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर-उक्कलगाव मार्गावरील शिवाजी पाटील वाबळे यांच्या वस्तीलगत काल रात्री साडेआठच्या सुमारास सहा जण संशयास्पदरीत्या लपून बसलेले घरच्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने नातेवाईक व ग्रामस्थांना संपर्क केला. काही तरूण तत्काळ मदतीसाठी धावून आले. यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवाजी पाटील वाबळे यांनी त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून हवेत एक राऊंड फायर केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित संशयित इसम दोन मोटरसायकलींवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बेलापूर, केसापूर, आंबी , दवणगाव तसेच सातभाई वसाहत परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात एकाच वेळी तीन ड्रोन फिरताना दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या ड्रोनच्या हालचालींनंतर काही ठिकाणी अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्याने ग्रामस्थांमध्ये संशय अधिकच वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संबंधित इसम मोटरसायकल सोडून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. संतप्त ग्रामस्थांनी त्या मोटरसायकलींची तोडफोड केल्याचीही माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील एकांतातील वस्त्यांवर राहणार्‍या ग्रामस्थांमध्ये या घटनांमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हे लोक कधी दुचाकींवरून तर कधी चारचाकींमधून येतात. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे तसेच बंदुका असल्याची चर्चा आहे, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक गावांमध्ये तरूणांकडून गस्त घालण्यास सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर बेलापूर आऊट पोस्ट येथे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ग्रामस्थांची बैठक घेत नागरिकांना धीर दिला. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन सतर्क असून संशयितांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच ड्रोनच्या हालचाली आणि संशयित इसमांच्या वावराचा तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Accident News : प्रशासनाचा निष्काळजीपणा! पाण्याच्या पाईपवर आदळून तरुणाचा मृत्यू,...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik रस्त्यावर सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता सुरू असलेल्या कामामुळे एका तरुण पित्याचा बळी गेल्याची दुर्देवी घटना शहरातील कृषी...