Tuesday, May 26, 2026
HomeनगरAhilyanagar : अवैध धंद्यांवर एसपी सुदर्शन यांचा कडक प्रहार

Ahilyanagar : अवैध धंद्यांवर एसपी सुदर्शन यांचा कडक प्रहार

‘क्रॉस रेड’चा धडाका || 25 दिवसांत साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा पोलीस अधीक्षकपदी रुजू होताच मुम्मका सुदर्शन यांनी अवैध धंदे, हप्तेखोरी आणि गुन्हेगारीच्या साखळीवर थेट प्रहार सुरू केला असून अवघ्या 25 दिवसांत जिल्ह्यात ‘क्रॉस रेड’चा जबरदस्त धडाका उडाला आहे. मटका, जुगार, अवैध दारू, वाळूतस्करी, गांजा, गोमांस आणि गुटखा अशा विविध अवैध व्यवसायांवर पोलिसांनी सुमारे 925 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करून चार कोटी 33 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

1 मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुदर्शन यांनी सर्वप्रथम कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी बसविण्यावर भर दिला. गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात ड्रग्ज, गुटखा, नशेची इंजेक्शने, टोळीयुद्ध, गावठी कट्ट्यांचा वापर आणि गोळीबाराच्या घटनांनी जिल्हा हादरला होता. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि काही अधिकार्‍यांच्या कथित साटेलोट्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. ही परिस्थिती ओळखून सुदर्शन यांनी थेट अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालण्याचे धोरण स्वीकारले. मात्र स्थानिक पोलिसांमधील काही कर्मचार्‍यांचे अवैध व्यवसायिकांशी असलेले संबंध कारवाईत अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘क्रॉस रेड’चा नवा फॉर्म्युला राबविला.

एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकण्यासाठी दुसर्‍या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना थेट आदेश दिले जाऊ लागले. त्यामुळे कारवाईची माहिती फुटण्याचे प्रकार कमी झाले असून अवैध व्यावसायिकांसह ठाणेदारांमध्येही खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधात नागरिकांनी थेट माहिती द्यावी, असे आवाहन एसपी सुदर्शन यांनी केले आहे. नागरिकांकडून मिळणार्‍या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सलग धाडसत्र सुरू ठेवले आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक अवैध अड्डे उद्ध्वस्त झाले असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

आक्रमक मोहीम
चंद्रपूर येथे कठोर व परिणामकारक कामगिरी बजावलेल्या एसपी सुदर्शन यांच्या कार्यशैलीची चर्चा आधीपासूनच होती. अहिल्यानगरातही त्यांनी रुजू होताच धडाकेबाज कारवायांचा सपाटा लावल्याने पोलीस दलातच मोठी धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध धंद्यांचे आर्थिक कंबरडे मोडणे आवश्यक असल्याची भूमिका सुदर्शन यांनी घेतली असून त्यांच्या या आक्रमक मोहिमेमुळे गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठाणेदारांमध्ये धास्ती
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध धंद्यांविरोधात ‘क्रॉस रेड’चा फॉर्म्युला राबविल्याने पोलीस दलातच खळबळ उडाली आहे. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसर्‍या ठाण्याच्या अधिकार्‍यांकडून छापेमारी केली जात असल्याने कारवाईची माहिती फुटणे थांबले आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांसह काही प्रभारी अधिकार्‍यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. कधी आणि कुठे धाड पडेल? या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या

MLC Election : विधान परिषदेसाठी 9 जणांनी नेले 16 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काल 9 इच्छुकांनी 16 उमेदवारी...