नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दहशतवादाला खतपाणी घालून पहलगाममध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले. यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केल्यानंतर पाकिस्तान अंतरराष्ट्रीय मंचावर फेक नरेटीव्हच्या माध्यमातून ‘व्हिक्टीम कार्ड’ खेळू पाहत आहे. पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार काँग्रेसचे खासदार शशी थरुर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. याबद्दलचे पत्रकच जारी करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कराचे आणि गुप्तहेर संघटना आयएसआयचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पाकिस्तान अडचणीत आला. आता पाकिस्तानने एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या सगळ्यावरुन पाकिस्तानची दहशतवादपूरक भूमिका जगासमोर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली आहे.
खासदारांचे पथक २२ मेच्या आसपास रवाना होऊ शकते. ३ ते ४ जूनपर्यंत पथक मायदेशी परतेल. पथकात विविध पक्षांचे खासदार असतील. यामध्ये भाजपचे दोन, काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राष्ट्रवादी (सपा) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जेडीयूचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी (सपा) च्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत एकनाथ शिंदे गटाचे नेतृत्व करतील.
कोण कोणत्या देशात जाणार?
सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेले हे प्रतिनिधीमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांना भेट देणार आहे. तेथे ते ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करतील. खासदारांचे पथक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध का आणि कसे कारवाई केली हे स्पष्ट करेल.
पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम
भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानच्या फेक नॅरेटिव्हविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचे मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हलचाली सुरू केल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून ७ खासदारांचे प्रतिनिधीमंडळ तयार केले आहे. हे प्रतिनिधीमंडळ विविध देशांच्या दौऱ्यावर जाणार असून सदस्य असलेल्या खासदारांना आधीच सरकारकडून निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा