Friday, May 3, 2024
Homeनाशिकरासाका बचाव समितीचे साखळी उपोषण

रासाका बचाव समितीचे साखळी उपोषण

निफाड। प्रतिनिधी Niphad

या गळीत हंगामात रासाका सुरू झाला पाहिजे यासाठी रासाका बचाव कृती समितीच्या वतीने निफाड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. दररोज चार कार्यकर्ते याप्रमाणे हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी रासाका बचाव समितीचे प्रवर्तक नामदेव शिंदे, सुयोग गिते, हेमंत सानप, विकास रायते यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील तिनही साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बाहेरील कारखाने वजनात घट धरुन ऊस तोडणीसाठी देखील पैसे द्यावे लागत आहे. त्यामुळे या हंगामात रासाका चालू व्हावा यासाठी रासाका बचाव कृती समितीने आमदार, खासदार, मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्यास यश न आल्याने मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयासमोर कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी रासाका बचाव समिती पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतांना जि.प.चे मा. शिक्षण सभापती राजेंद्र मोगल म्हणाले की, या उपोषण स्थळी येणार्‍या कुठल्याही नेत्याने राजकीय भाष्य करू नये. तसेच समितीच्या कार्यकर्त्याने कुठल्याही नेत्याबद्दल अपशब्द वापरू नये. हे उपोषण राजकारण विरहित चालू ठेवावे तसेच मागे काय झाले याकडे लक्ष देऊ नये. रासाका चालू झाला पाहिजे हा उद्देश असला पाहिजे. तसेच निविदा निघाल्यानंतर रासाका चालू झाला अन् महिन्यानंतर बंद पडला असे होऊ नये यासाठी प्रयत्न असावे असेही राजेंद्र मोगल म्हणाले. तर रासाका चालू व्हावा यासाठी रासाका कामगारांचा रासाका कृती समितीला पुर्ण पाठिंबा राहील असेही रासाका कामगार युनियनचे अध्यक्ष बळवंत जाधव म्हणाले.

रासाका युनियनचे अध्यक्ष बळवंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सोशल डिस्टन्स पाळत नामदेव शिंदे, सुयोग गिते, विकास रायते, हेमंत सानप यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. दररोज चार याप्रमाणे रासाका बचाव कृती समितीचे पदाधिकारी उपोषणास बसणार आहे. या साखळी उपोषणास प्रहार संघटनेसह शेतकरी संघटनेचे अर्जुन तात्या बोराडे यांनीही पाठिंबा दिला आहे.

तर या साखळी उपोषणप्रसंगी रासाका बचाव कृती समितीचे धोंडीराम रायते, सचिन वाघ, बंटी तासकर, विलास रायते, बाबूराव सानप, दत्तु मुरकुटे, बबन काळे, उत्तम रायते, चंद्रकांत उगलमुगले, उत्तम शिंदे, त्र्यंबक शिंदे, दत्तु रायते, गोकुळ कुंदे, विकास रायते, गोकुळ शिंदे, अरुण कुशारे, काशिनाथ वाघ, नितिन डेर्ले, सुयोग गिते, शिवराम रसाळ आदींसह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, निसाका-रासाका सभासद व रासाका कामगार उपस्थित होते.

तोपर्यंत चप्पल घालणार नाही

तालुक्याच्या विकासाचा साक्षीदार असलेला रासाका जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्णय मी सहा महिन्यांपूर्वी घेतला होता व त्याची अंमलबजावणी सुरू आहे. रासाका या गळीत हंगामात चालू झाला पाहिजे हीच आमची व ऊस उत्पादक शेतकर्‍यांची प्रमुख मागणी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.

नामदेव शिंदे, संस्थापक (रासाका बचाव कृती समिती)

- Advertisment -

ताज्या बातम्या