अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी चालत जात असलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन लंपास केल्या. रविवारी (8 डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास पवार चाळ, भोसले आखाडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरती संजीव घुबे (वय 55 रा. मारूती मंदिरासमोर, संग्राम कॉलनी, भोसले आखाडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्या रविवारी सायंकाळी भोसले आखाडा येथील पवार चाळ येथून रस्त्याने पायी चालत जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे त्यांच्याजवळ आले.
त्यांनी फिर्यादीजवळ येत दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एकाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याच्या दोन चेन ओरबाडल्या व दुचाकीवरून पसार झाले. फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुगडे करत आहेत.