Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवास प्रारंभ

सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवास प्रारंभ

चैत्रोत्सवकाळात दर्शनासाठी सप्तश्रृंगीदेवी मंदिर २४ तास खुले राहणार

- Advertisement -

सप्तश्रृंगी गड | वार्ताहर Saptshrungi Gad

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

उत्सवाच्या प्रारंभी विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा यासह देवीच्या महावस्त्र व अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गड परिसर जय मातादीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सकाळची पंचामृत महापूजा नाशिकचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

यावेळी संस्थानच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती के.के. पाटील, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चैत्रोत्सवकाळात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

भाविकांच्या सोयीसाठी तीन ठिकाणी उद्बोधन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात ३११ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन सेवा व प्रथमोपचार केंद्र २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

यात्रेसाठी येणार्‍या भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था तसेच शिवालय तीर्थ येथे मोठ्या प्रमाणात निवारा शेड (मंडप) कार्यारत करण्यात आले आहे, ई-टॉयलेटची व्यवस्था, पाणपोया, चप्पल स्टॅण्ड यांची सोय करण्यात आली आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हंगामी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

यात्रेच्या कालावधीत २६ मार्च ते ३ एप्रिल गडावर खासगी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून नांदुरी येथून एसटी बसद्वारे भाविकांची ने-आण करण्यात येत आहे. तसेच गडापासून एक किलोमीटर अंतरावर सालाबाद प्रमाणे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. दरम्यान, चैत्रोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनीही आज सप्तशृंगी देवीची आरती करून दर्शन घेतले.

चैत्रोत्सव यशस्वीतेसाठी विश्वस्त संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश पगार, यशवंत देखमुख, प्रशांत निकम, सुनील कासार, विश्वनाथ बर्डे, विजय भवरे, नारद आहिरे, शाम पवार, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित यांच्यासह सर्व विभागांचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्था सक्रियपणे कार्यरत आहेत.

गॅसटंचाईचा यात्रेवर परिणाम
गावोगावी भरवण्यात येणार्‍या यात्रांमध्ये यंदा पारंपरिक खाद्य पदार्थांचा तुटवडा जाणवू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने जिलेबी, लाडू, भेळभत्ता, गोडीशेव, रेवड्या यांसारख्या पदार्थांच्या दुकानांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी यात्रेचा रंग फिका पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...