Sunday, November 22, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘चला शाळेत जाऊ’ अभियानामुळे फुटणार बोगस पटसंख्येचा फुगा

Ahilyanagar : ‘चला शाळेत जाऊ’ अभियानामुळे फुटणार बोगस पटसंख्येचा फुगा

विशेष तपासणी मोहिमेत अडीच हजार शाळांची माहिती लवकर होणार संकलित

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिक्षकांची पदे टिकविण्यासाठी पटसंख्या फुगविण्याचे प्रकार आता उघड होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या ‘चला शाळेत जाऊ’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळांची पटपडताळणी सुरू असून, साडेतीन हजार शाळांपैकी एक हजार शाळांची माहिती प्राप्त झाली आहे. उर्वरित अडीच हजार शाळांची माहिती लवकरच संकलित होणार असल्याने बोगस पटसंख्येचे वास्तव समोर येण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या संकल्पनेनुसार शाळांमधील अध्यापन, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती, शैक्षणिक सुविधा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नियमित शाळा भेटींसोबतच विशेष तपासणी मोहिमेच्या माध्यमातून शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये या भेटींचे नियोजन करण्यात आले होते. यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख विशेष शिक्षक आणि पर्यवेक्षण करणार्‍या यंत्रणेतील अधिकारी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांची उपस्थिती, वर्गातील अध्यापन, विद्यार्थ्यांची वाचन-लेखन क्षमता, गणितीय कौशल्ये आणि अध्ययन निष्पत्ती यांची पाहणी केली.

तसेच शाळांमध्ये राबविण्यात येणार्‍या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आणि डिजिटल साधनांच्या वापराचाही आढावा घेतला. या शाळा भेटीदरम्यान निपुण भारत अभियान, मिशन आरंभ, विनोबा अ‍ॅपवरील नोंदी, आभासी वर्ग आणि संगणकासह डिजिटल शैक्षणिक साधनांचा वापर तपासण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय प्रवेश परीक्षेसाठी दिले जाणारे मार्गदर्शन, वाचन तास, वाचनालयाचा वापर, आनंददायी शनिवार आणि डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाईल.

शाळांच्या प्रशासकीय कामकाजात यू-डायस प्लस पोर्टलवरील माहिती अद्ययावत आहे का, विद्यार्थ्यांचे आधार व अपार ओळखपत्र नोंदणीची स्थिती काय आहे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी कोणती कार्यवाही केली जात आहे, याचीही तपासणी करण्यात आली. तसेच शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शाळांमधील भौतिक सुविधांकडेही लक्ष देण्यात आले. शालेय इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसरातील स्वच्छता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि पीएम पोषण योजनेंतर्गत दिल्या जाणार्‍या आहाराची गुणवत्ता तपासली. पर्यावरणपूरक उपक्रम, वृक्षसंवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष झालेल्या शाळा भेटींची नोंद सरल प्रणालीवर वेळेत करणे बंधनकारक करण्यात आले होते.

दरम्यान, शाळा भेटीमध्ये पटनोंदणी पूर्वी शाळांमधील विद्यार्थ्याची स्थिती, पट पडताळणीमध्ये शिक्षकांची पदे टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांची उसनवारी सुरू आहे का? पटनोंदणी योग्य आहे की नाही, याची खात्रीकरण्यात आली असून जिल्ह्यातील साडेतीन हजार शाळांपैकी एक हजार शाळांची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली असून उर्वरित अडीच हजार विद्यार्थ्यांची माहिती लवकरच संकलित होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

तपासणीसोबत सुधारणांसाठी मार्गदर्शन
शाळा भेटींचा उद्देश केवळ त्रुटी शोधणे नसून, शिक्षकांना आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन देणे, अध्यापनातील अडचणी दूर करणे आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सुधारणा घडवून आणणे हा आहे. भेटीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची नोंद घेऊन संबंधित शाळांना सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून सूचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी झाली आहे का, याचीही खातरजमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...