संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यातील शाश्वत पाण्यापासून वंचित असलेल्या चंदनापुरी, सावरगाव तळ, झोळे हिवरगाव पावसा आणि शिरापूर या गावांना निळवंडे कालव्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गावांसाठी निळवंडे कालव्यावरून उपसा सिंचन योजना राबवण्यास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित गावांमधील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमोद रहाणे, रामभाऊ रहाणे अंकुश रहाणे, श्याम रहाणे यांनी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती तसेच उपसा सिंचन योजनेची नितांत आवश्यकता याबाबत सविस्तर माहिती दिली होती. योजनेचा सर्वे पूर्ण झालेला असून पुढील कार्यवाही प्रलंबित असल्याची बाबही यावेळी मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली असता कार्यकारी अभियंता कवडे व माने यांनी योजनेचे प्रारूप सर्वेक्षण तसेच अंदाजपत्रक तयार असल्याची माहिती दिली. त्यानुसार योजनेस तत्काळ तत्वतः मान्यता देत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव नियामक मंडळासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून आजच्या आदेशामुळे योजनेच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीचे कार्यकर्ते या योजनेसाठी सातत्याने आग्रही व प्रयत्नशील होते. त्यामुळे तत्वतः मान्यता मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून शेतकर्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ पाटील यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी काशिनाथ पावसे, गोविंद खर्डे, अंकुश रहाणे, डी. टी. रहाणे, किसन सरोदे, नितीन रहाणे, गणेश दवंगे, केशव दवंगे आदी उपस्थित होते.
चंदनापुरी ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, सावरगाव तळ, झोळे हिवरगाव पावसा व शिरापूर या गावांना निळवंडे कालव्याचे पाणी मिळावे यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे या उपसा सिंचन योजनेबाबत आग्रह धरला होता. त्यांच्या पुढाकारामुळेच योजनेचा सर्वे पूर्ण झाला असून आता तत्वतः मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाहीस गती मिळाली आहे.




