सांगली | Sangli
अहिल्यानगर येथे झालेली 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मोठ्या वादामुळे चर्चेत आहे. गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अटीतटीची झाली. शिवराज राक्षे यानेही उपांत्य फेरीत पंचांने दिलेल्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. शिवराजने पंचाची कॉल धरली आणि लाथही मारली. तर दुसरीकडे पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने होते. मात्र महेंद्र गायकवाड याने सामना संपायला अवघे काही सेकंद बाकी असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान सोडले. दोघांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेकडून महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोघांचे ३ वर्षांसाठी निलंबन केले आहे. आता या घटनेवर आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया मोठी दिली आहे.
पैलवान शिवराज राक्षे यांनी खरंतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होते,असे विधान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केले आहे. एका अंगावर असताना कुस्ती देण्यात आली. माझ्या बाबतीतही असाच प्रकार तिसऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत झाला होता. शिवराज राक्षेने जी लाथ मारली ती चुकीची होती असे मी काल म्हटले होते. परंतु जो पंच होता त्याला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. १५-२० वर्षाची तपस्या करून तो महाराष्ट्र केसरीत तिसऱ्यांदा पोहचला होता. तुम्ही १० सेकंदात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करताय.
“२००७, २००८ साली मी महाराष्ट्र केसरी झालो. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी लढवणार मी ६० वर्षांतला पहिला पैलवान होतो. माझ्याबाबतही असेच घडले होते. माझ्या बाबतीत जे घडले, त्यानंतर मी आत्महत्येचा विचार केला होता. शिवराजने खरेतर त्या पंचाला गोळी घालून कुस्ती क्षेत्राला संदेश दिला पाहिजे. या गोष्टीपासून पंचांनी लांब राहिले पाहिजे. ज्या प्रेक्षकांना कळत नाही त्यालाही ही कुस्ती बरोबर झाली नाही हे कळते. यात पृथ्वीराजची चूक नाही. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे त्याचे मी अभिनंदन केले. परत स्पर्धा होणे शक्य नाही परंतु शिवराज राक्षेच्या बाबतीत जे घडले ते अन्यायकारक आहे असेही चंद्रहार पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादग्रस्त ठरली आहे. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. उपांत्य फेरीत शिवराज राक्षे हरल्यानंतर त्याने पंचांशी वाद घातला. तर महेंद्र गायकवाडच्या पराभवानंतर त्याच्या समर्थकांनी पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे गायकवाडच्या समर्थकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा