Thursday, May 2, 2024
Homeनगरशिवसेनेला हिंदूत्व शिकविण्याची आवश्यकता - चंद्रकांत पाटील

शिवसेनेला हिंदूत्व शिकविण्याची आवश्यकता – चंद्रकांत पाटील

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यात शिवसेनेने काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली म्हणून तुम्ही अयोध्येला गेले नाही.

- Advertisement -

तुम्ही अयोध्येला गेले असते तर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला असता, असा सनसनाटी टोला लगावत आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता असल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राज्यभर भाजपचे आंदोलन सुरू असून भाजपच्या आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आले आहे.

यावेळी व्यासपीठावर साधूसंत तसेच वारकरी संप्रदायाचे महंत उपस्थित होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शिर्डीत उपोषणकर्त्यांची भेट घेत या लाक्षणिक उपोषणाला पाठींबा दर्शवला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, महाराष्ट्रात लॉकडाऊन पाळल्यामुळेच करोनाचा प्रभाव कमी झाला. राज्यात बार सुरू आहेत मात्र मंदिरं बंद का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, अशी मागणी पाटील यांनी केली.

मंदिरात तुम्ही जात नाही, आम्हाला तर जाऊ द्या ना, मंदिरात काय वाघ सिंह आहेत का ? ते आम्हाला खाणार का, केवळ करोनाच ना, मग तुम्ही बस, रेल्वेसेवा, मॉल, बार सुरू केली त्यावेळी करोना तेथे आला नाही का? मग मंदिरातच का असा प्रश्न उपस्थित केला? तुम्ही मंदिरांसाठी एक विशिष्ट नियमावली तयार करून राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, अशी मागणी त्यांनी केली.

सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्टाकडून हव्या आहेत का, कोर्टाने आत्तापर्यंत किती वेळा सरकारला फटकारले. राज्यपाल कायद्याच्यादृष्टीने महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असल्याने त्यांनी त्यांच्या भावना का व्यक्त करू नयेत, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

याप्रसंगी महंत सुधीरदास महाराज, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजय महाराज धोंडगे, सुदर्शन महाराज कपाटे, आचार्य जिनेन्द्र जैन, प्रकाश महाराज गंगवाल, बबनराव मुठे, बालमभाई इनामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, नगरसेवक शिवाजी गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, रवींद्र गोंदकर, किरण बोराडे, योगेश गोंदकर, लखन बेलदार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या