शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडला आहे. वादळी वारे तसेच तज्ञांनी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतात हातात तोंडाशी आलेला घास नियती हिरावून घेते की काय? अशी भीती शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. बाजार समितीच्या प्रांगण सध्या कांद्याच्या गोण्या भरलेल्या वाहनांनी हाउसफुल्ल आहे. मात्र कांद्याची आवक वाढत असताना भाव मात्र कोसळले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. मोठ्या कष्टाने कर्ज काढून पिकासाठी खर्च केला मात्र सध्या मिळणारे भाव यामुळे उत्पादनासाठी झालेला खर्च तरी निघेल काय? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पीक विमा असला तरी पुरेशी नुकसान भरपाई मिळत नाही. रब्बीसाठी या योजनेतून नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकर्यांना आस लागून राहिली आहे. शेतकरी राजा रात्रंदिवस धावपळ करतोय आधीच दर कमी त्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची धास्ती निर्माण झाल्याने गहू, हरभरा ज्वारीवर विविध रोगांचा तसेच किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेवगाव तालुक्यात गहू 11,178, हरभरा 6 हजार 400, कांदा 7 हजार 768, ज्वारी 2 हजार 335 प्रति हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने दिली.
दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे त्याचा परिणाम पिकांवर होत असून बुरशीजन्य रोग पडून उत्पादन घटण्याचा धोका असल्याने शेतकर्यांनी कीड शोषणारी अळी, मररोग, चिकटा यांचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड यांनी व्यक्त केली. बदलत्या हवामानाचा परिणाम पिकांवर होऊन शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच रान डुकरे, हरिण यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा, अशीही मागणी होत आहे.
पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव
उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च वाढल्याने शेतकर्यांनी बदलत्या वातावरणाचा धसका घेतला आहे. कांद्यावर बुरशीजन्य करपा, गव्हावर काळा तांबेरा, मका ज्वारीवर लष्करी अळी, हरभर्यावर घाटे अळ्या, ज्वारीवर चिकटा, चारा पिकांची गुणवत्ता खराब झाल्याच्या शेतकर्यांतून तक्रारी आहेत. भाजीपाल्यावर मावा, फुलकिडे, तुडतुडे इत्यादी रोग किडीच्या संकटाने शेतकरी हैराण झाले आहेत.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणाम होतो. पाऊस, गारपीट झाल्यास शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. पिकांवर विविध रोगांचा तसेच किडींचा प्रादूर्भाव वाढतो यासाठी शेतकर्यांनी आवश्यक औषधांची मात्रा वापरून फवारणी करावी यासाठी संबंधित कृषी सहाय्यक व कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
– अंकुश टकले, तालुका कृषी अधिकारी.