लोणी |वार्ताहर| Loni
शेती व्यवसाय अगोदरच अडचणीत असताना रासायनिक खतांच्या किमतीत 1 जानेवारीपासून वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच अनेक खतांसोबत इतर खतांची लिंकिंग उत्पादक कंपन्यांनी केल्याने खत विक्रेते आणि शेतकरी दोघेही आर्थिक कोंडीत सापडले आहेत. एकीकडे खतांसोबत लिंकिंग करता येणार नाही, असे प्रशासकीय यंत्रणा सांगत असताना दुसरीकडे खत उत्पादक कंपन्या हुशारीने लिंकीग करीत असल्याचे खत विक्रेत्यांनी सांगितले. नवीन वर्ष सुखसमृद्धी घेऊन यावे म्हणून जगभरात जल्लोषात नववर्षाचे स्वागत झाले. मात्र नववर्ष शेतकर्यांसाठी निराशा घेऊन आल्याचे दिसते आहे. 1 जानेवारीपासून इफको आणि महाधन या खत उत्पादक कंपन्यांनी 10:26:26 या खतांच्या किंमतीत मोठी वाढ केली.
1 हजार 470 रुपयांना मिळणारे या इफकोच्या खताची बॅग आता 1 हजार 720 रुपयांना मिळत आहे. या खताची किंमत 250 रुपयांनी वाढली आहे .महाधनची या खताची 1 हजार 470 रुपयांना मिळणारी बॅग आता 1 हजार 750 रुपयांना मिळत आहे. या कंपनीने 280 रुपयांची वाढ केली आहे. महाधनने 24:24:0 या खताची किंमत 1 हजार 700 वरून 1 हजार 800 करताना 100 रुपयांची वाढ केली आहे. डीएपी या खतावर सरकार मोठी सबसिडी देत आहे. मात्र उत्पादक कंपन्यांनी अतिशय हुशारीने किंमतीत वाढ न करता त्या खतांसोबत दुसरे खत लिंकिंग करून ते घेण्याची सक्ती केली आहे. डीएपी सोबत नॅनो डीएपी किंवा टीडीएस खत लिंकिंग केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक बॅग सोबत दुसर्या खताची बॅग सक्तीने दिली जात आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी, पीडिएम पोटॅश, सागरिका आदी खते दिली जात आहेत.
खत विक्रेते कृषी सेवा केंद्र चालक, विविध कार्यकारी सोसायट्या यामुळे अडचणींचा सामना करीत आहेत. शेतकर्यांना लिंकिंग केलेले खत गरज नसताना घ्यावे लागत आहे. त्यामुळे लिंकिंग केलेल्या खताची 225 ते 1300 रुपये किमतीची अतिरिक्त खते घ्यावी लागत आहेत. यातून शेतकरी आणि खत विक्रेते यांच्यात वादही होत आहे. विक्रेत्यांचा नाईलाज असल्याने ते त्रस्त झाले आहेत. कोणताही गाजावाजा न करता खतांच्या किमती वाढवण्यात आल्याने शेतकर्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. युरिया ही सर्व पिकांसाठी अत्यावश्यक असल्याने ती मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. एक गोणी युरिया सोबत नॅनो युरिया घ्यावी लागत आहे.
शासकीय यंत्रणा खतांना लिंकिंग करता येणार नाही, असे जाहीरपणे सांगत असली तरी वास्तव मात्र वेगळे आहे. खत उत्पादक कंपन्या राजरोसपणे लिंकिंग करीत आहेत. मात्र ते करताना दोन्ही खतांचे चलन वेगवेगळे करून आम्ही लिंकिंग करीत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात लिंकिंग शिवाय विक्रेत्यांना खत दिले जात नाही ही सत्यता आहे. यामुळे शेतकरी आणि खत विक्रेते अक्षरशः हवालदिल झाले असून शासकीय यंत्रणांनी कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा खत विक्रेते आणि शेतकर्यांनी दिला आहे.