नाशिक । Nashik
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली. युतीचे गणित, मराठा आरक्षण, ओबीसी आंदोलन आणि ठाकरे बंधूंच्या भेटीवर त्यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीच्या समीकरणांबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, “वर्तमानपत्रातून वाचतो की तिन्ही पक्षांची (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) युती होणार. पण वास्तव वेगळं आहे.”
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगळी आहे. “काही ठिकाणी भाजप आणि अजित पवार गट एकत्र येतील, तर काही ठिकाणी शिंदे आणि अजित पवार गट युती करतील. काही भागांमध्ये भाजप बाजूलाही राहू शकतो. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहूनच युतीचे निर्णय घेतले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी मिश्किल टिप्पणी केली. पत्रकारानी महाजन आणि भुसे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच भुजबळ हसून म्हणाले, “मी काही एवढं लांब (डोनाल्ड ट्रम्पकडे) जाणार नाही. मी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाईन. फार फार तर मोदींपर्यंत (PM Modi) जाईन, पण त्यापलीकडे नाही.”
पडळकर यांच्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले, “असे काही वाक्य नाही. मी ते पुस्तक वाचणार आहे.” ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा’ या जुन्या वाक्यावर त्यांनी आठवण सांगितली. ते म्हणाले, “हा शब्दप्रयोग सुधाकर नाईक शिकारी होते तेव्हापासून चालत आला आहे. ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा’ हा त्यांचा छंद होता. सांगली हे लोकल वादळ आहे.”
जरांगे पाटील यांचे आंदोलन संपल्यानंतर ते विखे पाटील यांना भेटले, यावर आपण काहीच बोललो नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र जरांगे माझे नाव घेतात, म्हणून उत्तर द्यावे लागते. भुजबळ म्हणाले, “आम्ही मराठा आरक्षण विरोधी नाही. उलट मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र स्टेजवर कोण जाईल हे कोण ठरवणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जैन मुनींच्या कबुतर प्रकरणावर विनोदी शैलीत बोलताना भुजबळ म्हणाले, “सगळीकडे हत्ती, कुत्रे, कबूतर अशाच चर्चा आहेत. मला वाटतं सरकारने आता ‘चिमणी पार्क’ आणि ‘पोपट पार्क’ सुरू करावेत. एक ‘कावळा पार्क’ आहे, तो दहाव्याच्या दिवशी लागतो, त्याचंही पार्क करावं.” ठाकरे कुटुंब एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. “मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा आनंद आहे. माझ्या पत्नी या उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मैत्रिणी आहेत. ठाकरे घराण्यात ज्येष्ठ म्हणून कुंदा वहिनींचा आदर आहे,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले.




