पुणे । Pune
चाकण (ता. खेड) येथील महात्मा जोतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज (शुक्रवारी ता. ३) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत या पुतळ्यांचे अनावरण होणार आहे. त्यानिमित्ताने हे दोन्ही नेते पक्ष फुटीनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलल्यामुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज होते. त्यानंतर ते परदेशात गेले. त्यानंतर आता शरद पवार व त्यांच्यात काही राजकीय संवाद होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झाली आहे. पक्ष फुटल्यानंतर भुजबळांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. ते अजितदादांसोबत गेले. पण त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले आहे. उलट त्यांनी पवारांबद्दल आदरभाव दाखवला आहे. आता मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.