Thursday, May 14, 2026
HomeनगरAhilyanagar : वाहनांचे स्पेअरपार्ट तर नागरिकांची हाडे निखळण्याची वेळ!

Ahilyanagar : वाहनांचे स्पेअरपार्ट तर नागरिकांची हाडे निखळण्याची वेळ!

नगरचे महामार्ग बनले मृत्यूचे सापळे || खड्डेच खड्डे चोहीकडे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर शहरालगत असणार्‍या मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गावर सर्वत्र लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे महामार्गाची अक्षरशा चाळण झाली असून महामार्गावरून प्रवास करणार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज होणार्‍या लहान मोठ्या अपघातात मृत्यूचे तांडव पहावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षापासून नगर-मनमाड आणि वर्षभरापासून छत्रपती संभाजी महाराज रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे. याबाबत महामार्गावर असणार्‍या गावातील नागरिकांनी वेळोवळी या रस्त्याच्या दुरूस्ती मागणी, आंदोलन करूनही उपयोग झालेला नाही.

- Advertisement -

या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाकडून कायमच दुर्लक्ष होत असल्याने महामार्गावरील अपघातात अनेक निष्पापांना आपले बळी गमवावे लागले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या सर्व बाबीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप देखील नागरिक करत आहेत. महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. पावसाचे कारण पुढे करत महामार्ग दुरुस्तीसाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप देखील नागरिकांमधून होत आहे. शिर्डीमुळे मनमाड रस्त्याला महत्व असून याच रस्त्यावरून शिंगणापूरला जाता येते. यासह नगरहून मनमाडला जाणारी वाहतूक मोठी असल्याने या मार्गावर दररोज हजारो वाहने धावतात. याशिवाय या मार्गावर दर 10 ते 15 किलो मीटरवर गावे वसलेली येथील नागरिकांना या मार्गावरून दररोज प्रवास करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका या नागरिकांसह बाहेरून येणार्‍या वाहनांना बसत असून त्यातून अपघाताचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. अशी अवस्था छत्रपती संभाजीनगर रस्त्याची असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे. शनिशिंगणापूर, देवगड या धार्मिक स्थळांना भेट देणार्‍या भाविकांची संख्या देखील मोठी आहे. परंतु महामार्गाच्या दुरावस्थेमुळे भाविकांच्या संख्येतही घट झाली आहे. महामार्गाला साडेसाती लागल्याचे चित्र पाहावयास मिळते. महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

जेऊर घाटात कोंडी; वाहतूक वांबोरी घाटातून
दोन दिवसांपासून छत्रपती संभाजी महामार्गावर जेऊर ते पांढरीपूल दरम्यान असणार्‍या घाटात मोक्याच्या ठिकाणी दोन ते तीन अवजड वाहने नादुरूस्त झाली. ही वाहने रस्त्यातून बाजूला करणे शक्य नव्हते. अखेर फिटरला पाचरण करून ती जागेवर दुरूस्त करावी लागली. मात्र, शनिवार सकाळपासून या मार्गावर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्याने रविवारी सकाळापासून एसटीसह अन्य वाहतूक वांबोरी घाटामार्गे वांबोरी मार्ग पांढरीपूलाकडे सुरू होती. यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती.

ताज्या बातम्या

Kerala CM : केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला; काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर...

0
नवी दिल्ली | New Delhi नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ( Assembly Elections) भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पद्दुचेरीत यश मिळाले होते. तसेच...