देशभरात आज शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शिवनेरी किल्ल्यासह राज्यातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले.
शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी मराठीमधून ट्विट करत भावना व्यक्त केल्या. सोबतच, त्यांनी एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.’
पंतप्रधान मोदींनी एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये मोदी म्हणत आहेत की, माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये. हे फक्त राजा, महाराजा, राजपुरूष नाहीये. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव आहेत. आमच्यासाठी आराध्य देवापेक्षा मोठे काही असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाचं शौर्य, विचारधारा आणि न्याय प्रियतेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आहे. त्यांची धाडसी कार्यशैली, सामरिक कौशल्य आणि शांततापूर्ण राजकीय पद्धती आजही आपल्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत. आपल्या या गोष्टीचा अभिमान आहे की जगातील अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांची चर्चा होते, त्यावर संशोधन होत आहे, असेही ते व्हीडिओमध्ये म्हणत आहेत.
एवढ्या वर्षांनंतरही त्यांनी स्थापित केलेली मूल्ये आपल्याला पुढील वाटचालीसाठी मार्ग दाखवत आहेत. त्याच मूल्यांच्या आधारांवर आपल्याला अमृत काळाची 25 वर्षांची यात्रा पूर्ण करायची आहे. हा प्रवास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा. स्वराज्य, सुशासन आणि आत्मनिर्भरतेचा. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करतो, अशा शब्दात मोदींनी शिवरायांना अभिवादन केले.