बिजापूर । Bijapur
रविवारी राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले, तर दोन जवान शहीद झाले. दोन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवान डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG) आणि स्पेशल टास्क फोर्स (STF)चे होते. हे जवान माओवादविरोधी कारवायांमध्ये तज्ज्ञ होते.
सुरक्षा दलांना उद्यानात नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत मोठे नुकसान झाले. जखमी जवानांना रायपूर येथे हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.
राष्ट्रीय उद्यान परिसरात यावर्षी झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे. याआधी १२ जानेवारी रोजी येथे तीन माओवाद्यांना ठार करण्यात आले होते. सुरक्षा दलांनी या भागात आपली मोहीम अधिक तीव्र केली असून शोधकार्य सुरू आहे.