नाशिक | प्रतिनिधी | Nashik
निगेटीव्ह सीबील स्कोअर असताना तसेच जामीनदारांशिवाय कर्ज मंजूर करुन देण्याचे सांगत २०४ नागरिकांककडून ३४ लाख रुपये उकळून पसार झालेल्या ‘हाक मराठी अर्बन’ बँकेच्या मुख्य संचालकास शहर आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली आहे. त्याला न्यायालयाने दुसऱ्यांदा पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली असून तपास पथकाने या बँकेची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व्हे बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय)पत्रव्यवहार केला आहे. तर सूत्रधार भूषण वाघ याने बँक, कर्ज मंजुरी योजना आणि आर्थिक व्यवहार कसे केले, याचा तपास आता सुरु झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण सुरेश वाघ (वय ३१, रा. गणाधिश पार्क, विखे- पाटील शाळेसमोर, डीजीपीनगर नं-२, नाशिक, मुळ रा. मु. पो. आमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे तथाकथित हाक मराठी अर्बन निधी बँकेच्या मुख्य संशयित संचालकाचे नाव आहे. त्याला शहर आर्थिक गुन्हेशाखेने (दि. १६) रोजी नाशिक शहरातून अटक केली होती. यानंतर न्यायालयाने त्याला २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत तपास पूर्ण झाला नसल्याने (दि. २२) त्याला न्यायालयात (Court) हजर केले असता वाढीव पोलीस कोठडीची मागणी पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी केली.
हे देखील वाचा : संपादकीय : २४ जून २०२४- खारीचा वाटा मोलाचा…
तसेच न्यायालयाने वाघच्या पोलीस कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली आहे. संशयित भूषण वाघ याने सन २०२२ ते मे २०२४ या कालावधीत सिडकोतील उत्तमनगर बसस्टाॅपजवळ ‘हाक मराठी अर्बन निधी’ नावाची बँक सुरु केली. त्यानंतर बँकेतील संचालक मंडळ, व्यवस्थापन व कर्मचारी संशयित वर्षा हिराचंद्र पाटील, मेघा योगेश बागुल, मनिषा सुरेश पाटील, अमित अनंत बने, सुरेश विनायक पाटील, चंद्रशेखर लक्ष्मण कडू आणि व्यवस्थापक एकनाथ निवृत्ती पाटील, योगेश गुलाब पाटील यांच्यामार्फत संगनमताने अनेक योजना सुरु केल्या.
त्यानुसार होमगार्ड असलेल्या सोपान राजाराम शिंदे (रा. मु. पो. नाणेगाव, ता. जि. नाशिक) यांना मोबाईलवर संपर्क साधून ‘हाक मराठी बँक’ आपणास विनातारण, विना सिबिल स्कोअर, विना जामीनदार पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करेल’, असे सांगितले.तसेच या कर्जाचा व्याजदरही कमी असेल, ४५ दिवसात प्रोसेस पूर्ण करुन लोन देते’, अशी जाहिरात पाठविली. यावेळी शिंदे यांनी संशयित वाघ याच्या मोबाईलवर संपर्क साधल्यावर लोनची प्रोसेस व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती देत गंडा घातला होता. गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, ईओडब्ल्यूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या निर्देशाने पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण तपास करत आहेत.
हे देखील वाचा : अठराव्या लोकसभेचे आजपासून पहिले सत्र; बुधवारी अध्यक्ष निवड
आधी व्हा सभासद
पाच लाख रुपये कर्ज पाहिजे असेल तर, आधी बँकेचे सभासदस्यत्व स्विकारावे लागेल, असे वाघ याने शिंदे यांच्यासह इतर २०३ सभासदांना कळविले. त्यासाठी सभासद फी-पंधराशे रुपये, कर्जाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी दोन हजार रुपये, इन्शुरन्ससाठी तीन हजार रुपये, व्हेरिफिकेशन फी एक हजार रुपये असा साडेसात हजार रुपयांचा खर्च सांगितला. त्यानंतर वाघ याने संशयित वर्षा पाटील यांचा ऑनलाइन क्यूआर कोड शिंदे यांच्या व्हाटसअपवर पाठवून पैसे पाठविण्यास सांगितले. हे पैसे व इतर दहा हजार असे १७ हजार पाचशे रुपये पाठवून बँकेचे पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट संशयिताने शिंदे यांना पाठवून कर्ज मंजूर केले नाही. अशाच स्वरुपात इतर २०३ कर्जाेच्छुक नागरिकांची फसणूक केली.
मुद्दे
आतापर्यंतच्या तपासात वाघ हाच मास्टरमाईंड असल्याचे उघड
भूषणे डीजीपीनगरला मेडिकल स्टोअर, किराणा दुकान
कौटुंबिक पार्श्वभूमी सधन
गुन्ह्यातील इतरांचा शोध घेऊन चौकशी सुरु
हाक मराठी बँकेचे कागदपत्रे व डाटा आरबीआयकडे रवाना
आरबीआय लवकरच देणार बँक परवाना नोंदीचा अहवाल
पाचशे रुपयांपासून आठ हजारांपर्यंतचे आर्थिक व्यवहार उघड
अपहारित ३४ लाख रुपयांचा वापर कुठे झाला याचा तपास
कागदपत्र, मंजुरी, शिक्के, लेटरहेडचा तपास सुरु
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा