Sunday, November 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

पाच कोटी सदस्यसंख्येचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

- Advertisement -

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या ऐतिहासिक व प्रतिष्ठित संघटनेच्या १३ व्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या पदभाराचा स्वीकार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील ८० लाख सदस्यांच्या वतीने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगून, संघटनेची सदस्यसंख्या ५ कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी कार्यक्रमास संघटनेच्या उपाध्यक्षा प्रतिभा पांड्या, मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल, अतिरिक्त मुख्य राष्ट्रीय आयुक्त एम. ए. खालिद, राष्ट्रीय आयुक्त (स्काऊट) मनीषकुमार मेहता, अतिरिक्त आंतरराष्ट्रीय आयुक्त मधुसूदन अवला, डीएएन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सनी पांड्या यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य हे सेवा आणि शिस्तीतून घडत असते. देशाचे नागरिक आणि विशेषतः तरुण पिढी ज्या प्रकारचे चारित्र्य अंगीकारते, त्यावरच त्या राष्ट्राचे भविष्य अवलंबून असते. युवा पिढीला योग्य दिशा देऊन त्यांच्यामध्ये सेवा, शिस्त आणि राष्ट्र व समाजाप्रति समर्पणाची भावना रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या माध्यमातून केले जाते. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही संघटना एका भक्कम पुलाचे काम करत असून, ही एक मोठी राष्ट्रसेवा आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे जे स्वप्न पाहिले आहे, त्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत आहे. या विकसित भारताचा खरा पाया आणि आधारशिला आपली मुले व तरुण पिढी आहे.

योग्य वयात मुलांवर चांगले संस्कार झाल्यास भविष्यात तीच मुले सुसंस्कृत पिढीचे नेतृत्व करतात. त्यामुळे २०४७ च्या विकसित भारतामध्ये सेवा आणि शिस्तीने परिपूर्ण तरुण राष्ट्रीय व सामाजिक चेतनेचे नेतृत्व करतील, यासाठी संघटनेचा हा पाया अधिक मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अत्यंत चांगले कार्य झाले असून, आगामी काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या पूर्ण क्षमतेने संघटनेला अधिक पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. प्रधानमंत्री यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्य आणि नीतिमत्तेशी घट्ट नाते असलेली एक सेवारत, शिस्तबद्ध आणि संवेदनशील युवा पिढी घडविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या उपाध्यक्षा प्रतिभा पांड्या यांनी संघटनेचे १३ वे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले. त्यावेळी त्या म्हणाल्या, गेल्या ७६ वर्षांपासून शिक्षक, स्वयंसेवक आणि पालकांच्या योगदानातून उभ्या राहिलेल्या या चळवळीची सदस्य संख्या आज ८० लाखांहून अधिक झाली आहे. या संघटनेचा विस्तार करताना प्रामुख्याने ‘पोहोच, गुणवत्ता आणि अभिमान’ या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार असून, त्याचप्रमाणे याअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच संधी उपलब्ध करून देणे, तसेच प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्वगुणांचे दर्जेदार प्रशिक्षण देणे हे प्रमुख उद्दिष्ट असेल. संघटनेचे नेतृत्व आणि स्वयंसेवक हे या चळवळीचा खरा कणा असल्याने त्यांच्या अडचणी सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही श्रीमती पांड्या यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’चे १३ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्षीय सनद आणि स्काऊट स्कार्फ प्रदान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांमार्फत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘द भारत स्काउट्स आणि गाईड्स’च्या राष्ट्रीय संघटनेच्या 13 व्या अध्यक्षपदाचा आज पदभार स्वीकारला.

@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai https://t.co/XHlU31nrLa— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2026

ताज्या बातम्या

Kopargaon : वाहनांतून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांकडून पर्दाफाश

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon कोपरगाव शहर व परिसरात वाहनांमधून डिझेल चोरी करणार्‍या टोळीचा कोपरगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येवला नाका परिसरात रात्रीच्या वेळी...