Friday, July 3, 2026
Homeनगरराहुरी तालुक्यात बालविवाह रोखला; उडान प्रकल्प, चाईल्ड हेल्पलाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

राहुरी तालुक्यात बालविवाह रोखला; उडान प्रकल्प, चाईल्ड हेल्पलाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

राहुरी (प्रतिनिधी)

अहिल्यानगर जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, चाईल्ड हेल्पलाईन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले. विशेष म्हणजे, विवाहस्थळी मंगलाष्टके सुरू असतानाच संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून बालविवाह रोखला.

- Advertisement -

उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांना उडान हेल्पलाईनवर एका जागरूक नागरिकाकडून अवघ्या १४ वर्षीय मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या सीमा जुनी यांच्याकडे पुढील हस्तक्षेपाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर तात्काळ १०९८ चाईल्ड हेल्पलाईन, ११२ पोलीस आपत्कालीन सेवा, संबंधित गावचे ग्रामसेवक तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी हा विवाह नसून केवळ साखरपुडा असल्याचा दावा केला. मात्र मुलीचे अल्पवय, प्राप्त झालेली माहिती आणि विवाहाची सुरू असलेली तयारी लक्षात घेता प्रकरण अत्यंत संवेदनशील मानण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासन, ग्रामसेवक आणि उडान प्रकल्पाच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे सखोल चौकशी केली.

चौकशीदरम्यान संबंधित कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे होणारे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. समुपदेशनानंतर कुटुंबियांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि अखेर अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवण्यात यश आले. त्यानंतर संबंधित कुटुंबियांचे जबाब नोंदविण्यात आले, आवश्यक पंचनामा करण्यात आला आणि पुढील समुपदेशन तसेच कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना बाल कल्याण समिती, अहिल्यानगर यांच्यासमोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. उडान प्रकल्पामार्फत या प्रकरणाचा पुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, संबंधित मुलीचे संरक्षण, शिक्षण आणि तिच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी दिली.

ताज्या बातम्या

स्टिंग

Narhari Zirwal: स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधान भवनात चर्चा, मंत्री नरहरी झिरवाळांचा...

0
मुंबई | Mumbaiगेल्या काही काळात स्टिंग एनर्जी ड्रिंक हे शितपेय तरुणांसोबत लहान मुलांमध्येही कमालीचे लोकप्रिय झाले आहे. एनर्जी ड्रिंक म्हणून हे पेय तरुणांमध्ये लोकप्रिय...