प्रा.भालचंद्र पाटील
आधुनिक भारताचे शिल्पकार, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस. त्यांनी आधुनिक भारताचा दीप प्रज्वलित केला. नेहरूंचा जीवनप्रवास हा केवळ राजकीय नव्हता, तर राष्ट्रनिर्मितीची अखंड साधना होती.
भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे लोकमान्य टिळकांचा कणखरपणा, गांधीजींच्या अहिंसेचे तेज, सुभाषचंद्र बोसांचे क्रांतिकारक विचार आणि भगतसिंहांसारख्या असंख्य तरुणांचे बलिदान हे आपल्याला माहीत आहे. परंतु या सर्व विचारांच्या केंद्रस्थानी जो बुद्धिमान, आधुनिक आणि करुणामय नेता उभा राहिला तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरू केवळ नेते नव्हते; ते विचारांचा झरा होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला. अहमदनगर किल्ल्यातील तुरुंगात असताना त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा अजरामर ग्रंथ लिहिला, जो आजही असंख्य पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांचे आत्मचरित्र आणि लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर ही इंदिराजींना लिहिलेली पत्रसंपदा म्हणजे विचारांचा खजिना आहे.
गांधीजींनी राष्ट्राचा आत्मा घडवला, तर नेहरूंनी त्याचा मेंदू. गांधीजींनी अहिंसा, संयम, सत्य व त्यागाचा मार्ग दिला, तर नेहरूंनी विज्ञान, शिक्षण आणि विवेकाचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी सांगितले, राष्ट्राचे भविष्य शाळेच्या वर्गात घडते. यामुळेच त्यांनी शाळा, विज्ञान संस्था, उद्योग आणि संशोधन केंद्रे उभारून आधुनिक भारताची पायाभरणी केली.
उद्योग, शिक्षण, लोकशाही : स्वातंत्र्यानंतर भारतासमोर दारिद्य्र, अज्ञान आणि विषमता ही तीन मोठी आव्हाने होती. नेहरूंनी कोणालाही दोष न देता त्या समस्यांवर काम केले. त्यांनी आयआयटी, एआयआयएमएस, डीआरडीओ, इस्रो, भेल, एचएएल, एलआयसी, ओएनजीसी यांसारख्या संस्थांची पायाभरणी केली. त्यांच्या दृष्टीने शाळा म्हणजे राष्ट्र घडवणार्यांची प्रयोगशाळा होती.
नेहरूंची लोकाभिमुखता शब्दांत नाही, कृतीत दिसली. नेहरूंनी शेतकर्यांसाठी धरणे बांधली, पण सिंचनासाठी पैसे घेतले नाहीत. नेहरूंनी देशभरात महामार्ग बांधले, पण जनतेकडून टोल आकारला नाही. नेहरूंनी शाळा आणि महाविद्यालये उघडली, पण मुलांकडून शिकवणी फी घेतली नाही. नेहरूंनी देशभरात रुग्णालये उघडली, पण रुग्णांकडून पैसे घेतले नाहीत. नेहरूंनी देशभरात सरकारी नोकर्या दिल्या, पण बेरोजगारांकडून पैसे घेतले नाहीत. नेहरूंनी देशभरात लसीकरण केले, पण लसीकरण झालेल्या फॉर्मवर आपला फोटो छापला नाही.
नेहरूंच्या नेतृत्वाची खरी ओळख :त्यांच्या आचार व विचारात सत्ता ही प्रसिद्धीसाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी होती.
धर्मनिरपेक्षता आणि परराष्ट्रनीती : मी हिंदू आहे, पण प्रथम भारतीय आहे, असे ते ठामपणे म्हणत. धर्मनिरपेक्षता ही त्यांच्या दृष्टीने केवळ राजकीय भूमिका नव्हती, ती त्यांची जीवनशैली होती. ते म्हणत, धर्म म्हणजे मानवतेचे अनुशासन आहे, राजकारणाचे साधन नव्हे. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानशी संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारला. त्यांची परराष्ट्रनीती अलिप्ततावादावर आधारित होती, ज्यात भारताने स्वतःचा स्वाभिमान राखला आणि दोन्ही महासत्तांपासून स्वतंत्र धोरण स्वीकारले.१९६२ मध्ये चीनसोबत संघर्ष झाला तरी त्यांनी भारताच्या आत्मविश्वासाचा दीप विझू दिला नाही. नेहरूंची शांततेची नीती ही कमजोरी नव्हे, तर सभ्यतेवरील विश्वास होता.
आज काही राजकीय पक्ष नेहरूंच्या कार्यावर टीका करतात, पण ते विसरतात की, जर भारतात लोकशाही आहे, विज्ञान आणि उद्योग आहेत, शाळा आणि रुग्णालये आहेत, तर ती नेहरूंच्या दृष्टिकोनाची फळे आहेत. त्यांनी देश उद्ध्वस्त स्थितीत स्वीकारला, पण त्यावरून एक नवभारत उभा केला. जेव्हा भारतात टाचणीसुद्धा तयार होत नव्हती, तेव्हा त्यांनी इस्रो आणि आयआयटीसारखी स्वप्ने पाहिली.
नव्या भारतासाठी नेहरूंची गरज : आजची जेनझी पिढी तंत्रज्ञानात वेगाने धावत आहे, पण तिच्या मनात मूल्यांची तहान आहे. नेहरूंचा विचार म्हणजे विज्ञान आणि मानवतेचा संगम, विवेकशील देशभक्तीचा मार्ग. राष्ट्रवाद म्हणजे इतर धर्म किंवा शेजार्यांबद्दल द्वेष नव्हे. तो विवेक, मानवता आणि प्रगतीचा संगम आहे. नेहरूंनी जो विचार मांडला तो केवळ भूतकाळाचा नाही, तर भविष्याचा आरसा आहे. जेव्हा अंध राष्ट्रवादाचा काळ येतो, तेव्हा नेहरूंच्या विचारांचा बुद्धीचा दीप अधिक तेजाने झळकतो. नेहरू हे केवळ इतिहास नाहीत, तर प्रत्येक प्रगतिशील भारतीयाच्या विचारात आजही जिवंत आहेत.





