नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
टॅरिफच्या माध्यमातून मनमानी दादागिरी करून अवघ्या जगावर दबाव आणणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनने मोठा धक्का दिला आहे. सात वर्षांत पहिल्यांदाच चीनने अमेरिकन सोयाबीन खरेदी केलेले नाही. चीनने सप्टेंबर महिन्यापासून अमेरिकेतून सोयाबीन आयात केले नाही. नोव्हेंबर २०१८ नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सोयाबीन खरेदी पूर्णपणे थांबली आहे.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार शिपमेंटमध्ये घट ही चीनने अमेरिकन आयातीवर लादलेल्या उच्च शुल्कामुळे झाली आहे. तसेच पूर्वी कापलेल्या अमेरिकन पुरवठ्यातील, ज्याला ओल्ड-क्रॉप बीन्स म्हणून ओळखले जाते, आधीच व्यापार करण्यात आला आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा खरेदीदार देश आहे. परंतु अमेरिकेसोबत चाललेल्या टॅरिफ वॉरमुळे सोयाबीनच्या आयातीत घट झाली आहे. काही प्रमाणात जुना साठा अद्यापही मार्केटमध्ये येत आहे.
सीमाशुल्क आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात ब्राझीलमधून होणारी आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 29.9 टक्के वाढून 10.96 दशलक्ष टन झाली, जी चीनच्या एकूण तेलबिया आयातीच्या 85.2 टक्के आहे. अर्जेंटिनाची आयात 91.5 टक्क्यांनी वाढून 1.17 दशलक्ष टन झाली, जी एकूण आयातीच्या 9 टक्के आहे.
सप्टेंबरमध्ये चीनमध्ये सोयाबीन आयात १२.८७ मिलियन मेट्रिक टन इतके झाले. जे आतापर्यंत दुसरी सर्वात मोठी आयात होती. त्यात अमेरिकन सोयाबीनचा समावेश नाही. चीन आणि इतर देश अमेरिकेतून सोयाबीन खरेदी करण्याऐवजी ब्राझील, अर्जेंटिनासारख्या देशातून खरेदी करत आहेत. मात्र ट्रेड वॉरमुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांना अब्जो डॉलरचे नुकसान सहन करावे लागत आहे.
दरम्यान, व्यापार करार न झाल्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. बीजिंग-आधारित अॅग्राडार कन्सल्टिंगचे संस्थापक जॉनी जियांग म्हणाले की, जर व्यापार करार झाला नाही, तर पुढील वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान चीनला सोयाबीन पुरवठ्याच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. सोयाबीन खरेदीवर लवकरच तोडगा काढला जाईल असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




