उमराणे | वार्ताहर Umrane
येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग सहा दिवसांच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाल्याने गत दोन दिवसापासून विक्रमी आवक होत आहे. पहिल्याच दिवशी उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल १ हजार ३५१ रूपये उच्चांकी भाव मिळाला तर सरासरी ८०० ते ११०० रूपयांपर्यंत भाव उत्पादकांना मिळाला.
भगवान महावीर जयंती, बँकांचे वार्षिक कामकाज आणि लेबर टंचाईमुळे ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते. प्रदीर्घ सहा दिवसांच्या सुट्टीनंतर लिलाव सुरू झाल्याने सोमवारी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. दिवसभरात १ हजार ०८६ ट्रॅटर आणि २३५ पिकअप अशा एकूण १ हजार ३२१ वाहनांतून सुमारे २१,००० क्विंटल कांद्याची विक्रमी आवक नोंदवण्यात आली होती. कांद्याची विक्रमी आवक होवून देखील उन्हाळी कांदा: किमान ८०० ते कमाल १३५१ रुपये सरासरी १०५० रुपये, लाल कांदा: किमान ५०० ते कमाल १११२ रुपये सरासरी ९०० रुपये भाव शेतकर्यांना मिळाला.
सलग सहा दिवस लिलाव बंद राहिल्याने आवक वाढली, परिणामी दरावर काहीसा दबाव दिसून आला. सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सरासरी भाव ९०० ते ११०० रुपयांच्या दरम्यान आहेत. अवकाळी पाऊस आणि निर्यातीमधील तांत्रिक अडचणींमुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहे.
दरम्यान आज मंगळवारी देखील १९ हजार ५०० क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. १ हजार ३१५ रूपये सर्वोच्च तर सरासरी ११०० रूपये व कमीतकमी ८०० रूपये भाव शेतकर्यांना मिळाला. मक्याची देखील ३ हजार ५०० क्विंटल आवक होवून सर्वोच्च १८२५, सरासरी १७०० रूपये तर कमी १४५० रूपये असा भाव शेतकर्यांना मिळाला.
शेतकर्यांनी आपला कांदा योग्य प्रकारे प्रतवारी करून विक्रीसाठी आणल्यास अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असे आवाहन सभापती देवानंद वाघ, उपसभापती सतीश ठाकरे व सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.




