मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढला. शरद पवारांच्या भाषणाने मोर्चाची सांगत झाली. यावेळी शरद पवारांनी आपल्या भाषणात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीसह सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून प्रहार केला.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘देवाभाऊ’ संबोधून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून, पवारांच्या केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टची सुरुवातच “माननीय पवार साहेब, शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखविल्याबद्दल आपले आभार,” अशा उपरोधिक वाक्याने केली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “आपण कृषिमंत्री असताना काय केले आणि राज्यात ५५,००० हून अधिक शेतकरी आत्महत्या का झाल्या, हेही सांगितले असते तर बरे झाले असते.” या टीकेतून त्यांनी पवारांच्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वाघ यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यांनी म्हटले की, “आमच्या नेत्याची जलयुक्त शिवार योजना तुमच्या महाविकास आघाडी सरकारने स्थगित केली, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा नव्हता का? मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगित केली तेव्हा तुमचा शेतकऱ्यांचा कळवळा कुठे गेला होता? तसेच, बांधावर ५०,००० रुपयांचे आश्वासन देऊनही ते उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले नाही, तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का?”
या सर्व प्रश्नांमधून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले. त्या म्हणाल्या, “आमच्या देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवले आहे आणि ते घडवत आहेत. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठीच होता, पण तुम्ही त्याला विरोध केला. तुम्ही केवळ सत्तेचे राजकारण केले, पण राजकारण हे सेवेचाही भाग आहे, हे तुम्ही विसरलात का?”. आपल्या टीकेच्या शेवटी वाघ यांनी पवारांना एक नम्र विनंती केली. “तुमच्या राजकारणासाठी किमान आमच्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, एवढीच विनंती आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की,”काळ्या आईशी इमान राखणारे शेतकरी अस्वस्थ आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असतो. अतिवृष्टी झाली तर त्याचा परिणाम शेतकरी वर्गावर होता. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट आल्यावर त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्राची असते. पण आजचे राज्यकर्ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. गेल्या दोन महिन्यात दोन हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी जीव देतो, एवढी टोकाची भूमिका घेतो परंतु असे असतानाही संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागे उभे राहत नाही ही फार गंभीर गोष्ट आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “एकीकडे शेतकर्यांचा संसार अडचणीत आला असताना दुसरीकडे देवाभाऊंनी सगळ्या महाराष्ट्रात पोस्टर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचे दाखवले. बळीराजा उपाशी राहत कामा नये, ही शिवाजी महाराजांची शिकवण होती. तो आदर्श देवाभाऊ घेतील असे वाटले होते पण त्यांनी तसे केले नाही.जर शेतकऱ्यांच्या या मोर्चाची दखल घेतली नाही तर नाशिकचा हाच मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. नेपाळमध्ये काय घडले त्याच्या खोलात मी जात नाही. मात्र देवाभाऊ यातून शहाणपणा घेतील, असा इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला.
मी देशाचा कृषीमंत्री असताना एकदा माझ्या वाचनात आले की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग याना विनंती केली शेतकरी जीव देत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही. जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन समजून घेऊ अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग तयार झाले आणि नागपूर, अमरावती, यवतमाळला आम्ही गेलो. आत्महत्या केलेल्या कुटुंबाची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या बायका ढसाढसा रडत होत्या. मी विचारले तुम्ही का रडताय? त्यावर सोसायटीचे कर्ज काढले होते, ते आता थकले आहे, खाजगी सावकारकडचे कर्ज थकले आहे. मालकाला सहन झाले नाही. त्यांनी जीवन संपवले, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग असून, त्यावर उपचार केले पाहिजे म्हणून आम्ही १० दिवसांत ७० हजार कोटी रुपये देऊन कर्जमाफी केली, अशी आठवण शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितली.
नाशिकचा कांदा जगात जातो. पैसे आल्यावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण करतो. त्यात सरकारने निर्यातीला बंदी केली. याठिकाणी किंमत देत नाही आणि बाहेर विकू देत नाही. तीच गोष्ट सोयाबीन आणि इतर शेतीची आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, सरकारला शेतकऱ्यांचे दुख समजत नाही, असेही शरद पवारांनी म्हटले.





