Sunday, June 14, 2026
Homeक्राईमCrime News : खाकीतील ‘ते’ एजंट अद्याप मोकाट!

Crime News : खाकीतील ‘ते’ एजंट अद्याप मोकाट!

सिस्पे-ट्रेडस-इन्फिनिटी घोटाळा || कर्मचार्‍यांनीच सहकार्‍यांना लावला चुना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सिस्पे, ट्रेडस, इन्फिनिटी या कंपन्यांनी उभारलेल्या कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याचे पडसाद जिल्हा पोलीस दलात उमटू लागले आहेत. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्थानिक एजंटगिरी करणार्‍यांमध्ये जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे वास्तवसमोर आले आहे. कर्तव्य बजावताना खाकी वर्दी घालणारे हे कर्मचारी, एजंटगिरीच्या मोहात अडकून सहकार्‍यांच्याच पैशांना गंडा घालायला निघाले आहेत. यामुळे या एजंटांना शोधून त्यांना आरोपी करून अटक करावी व खात्यातून निलंबित करण्याची मागणी गुंतवणूकदार पोलिसांतून होत आहे.

- Advertisement -

नवनाथ औताडे याने जादा परताव्याचे आमिष दाखवत जिल्हाभर सिस्पे, ट्रेडस, इन्फिनिटी आदी कंपन्यांचे जाळे निर्माण केले. त्याने पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांना हाताला धरले. सुरूवातीला त्यांना स्वतः गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नंतर नवीन गुंतवणूकदार आणा, भरघोस कमिशन मिळेल असे आमिष दाखवून एजंट तयार केले. यामध्ये पोलीस दलातील कर्मचारी सक्रिय झाले. हेच कर्मचारी नोकरीतील सहकार्‍यांना विश्वासात घेऊन गुंतवणूक करायला भाग पाडत होते. परताव्याच्या आमिषाने त्यांनी स्वतःच्या खात्यांमधूनच कोट्यावधी रूपयांची माया गोळा केली. आता घोटाळा उघड झाल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संचालक मंडळ पसार झाल्याने अनेक गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. काही एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र पोलीस दलातील एजंट असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई होत नसल्याची तीव्र नाराजी पोलीस दलातील गुंतवणूकदारांमध्ये आहे. आपल्याच सहकार्‍यांकडून पैसे गुंतवले, आता तगादा लावला तरी ते पैसे देत नाहीत. उलट आमचं काहीही बिघडणार नाही अशी त्यांची उघड भावना आहे, अशी वेदना फसवलेले पोलीस व्यक्त करत आहेत. खाकी वर्दीतील कर्मचारीच जर गुंतवणूक फसवणुकीत एजंट म्हणून काम करू लागले, तर सामान्य नागरिकांचा पोलीस दलावरचा विश्वास डळमळीत होणार आहे. जिल्ह्यातील या चर्चित घोटाळ्यातील एजंट पोलीस कर्मचार्‍यांवर ठोस कारवाई होण्याची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे.

गुंतवणूकदार पोलिसांची मागणी
आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस खात्यातील एजंट शोधून त्यांच्याविरोधातील भक्कम पुरावे गोळा करून त्यांना तत्काळ गुन्ह्यात आरोपी करून अटक करावी, त्यांनी अनेकांना फसविले असल्याने त्यांना खात्यातून निलंबित करावे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे या प्रकरणावर विशेष लक्ष असून, घोटाळ्यातील खरे सूत्रधार एजंट बाहेर काढण्याचे आदेश त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला द्यावेत अशी मागणी गुंतवणूकदार पोलिसांमधून होत आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...