नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये प्रस्तावित ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे. आज १६ ऑक्टोबर रोजी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन कार्यकर्त्यांना यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी तिरंगा रॅलीची हाक दिली होती.
दिपके यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रध्वज फडकवणे हा गुन्हा नसल्याची भूमिका मांडली होती. मात्र, कनॉट प्लेस परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी प्रस्तावित रॅलीबाबत आक्षेप घेतला होता. परवानगीशिवाय जमाव जमविल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.
रॅलीच्या पार्श्वभूमीवर कनॉट प्लेस परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सेंट्रल पार्क १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी प्रशासकीय कारणास्तव नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. परिसरातील काही रस्त्यांवरील वाहतुकीवरही निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एकीकडे अभिजित दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्याकडून हातात तिरंगा घेऊन रॅली सुरु करण्यात आली आहे.



