अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेच्या सफाई कामगार महिलेला घरात बोलावून घेऊन त्यांच्यावर हल्ला करत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडित 31 वर्षीय महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात चार महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील वारूळाचा मारूती परिसरात राहणार्या चार महिलांविरूध्द शनिवारी (16 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 13 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्या आपले काम संपवून घरी परतल्या असता, संशयित आरोपी महिला तेथे आली व माझ्या बहिणीच्या घरात चल असे म्हणून फिर्यादीला घरामध्ये नेले. फिर्यादी महिला तिथे गेल्या असता, तुझे आधारकार्ड माझ्या पतीच्या मोबाईलमध्ये कसे आले या कारणावरून वाद उकरून काढण्यात आला. आधारकार्डचा जाब विचारत तिथे उपस्थित असलेल्या चार संशयित महिलांनी फिर्यादीला मारहाण केली.
हा वाद इतक्यावरच थांबला नाही, तर संशयित महिलांनी फिर्यादीचे कपडे फाडून त्यांना जमिनीवर पाडले. डोके जमिनीवरील फरशीवर आदळून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. महिलांनी संगनमत करून फिर्यादीला विवस्त्र करत त्यांची विटंबना केली आणि शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या हल्ल्यानंतर फिर्यादी महिलेला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असताना पीडितेने तोफखाना पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. या जबावाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड अधिक तपास करीत आहेत.





