मुंबई । Mumbai
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि महत्त्वपूर्ण मानली जात होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.
अजूनही महाराष्ट्राच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे व खासदार संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे मतदारांची संख्येवरुन संशय व्यक्त केला आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात किती मतदार आणि कुठे वाढले हे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. दिल्लीमध्ये मोठा पराभव होणार असल्याने ते कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहित आहे दिल्लीत त्यांचा सुपडासाफ होणार आहे, म्हणून राहुल गांधीनी ही तयारी सुरु केली आहे. फडणवीस पुढे म्हणाले, मी वारंवार सांगतो, जोपर्यंत गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाहीत. त्यांचा पक्ष देखील पुन्हा तग धरु शकणार नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.
उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले’ असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्यानं ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे, असे अवाहनही त्यांनी राहुल गांधींना केले आहे.