अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत नगरला आज रविवार, (दि. 21) 12 परीक्षा केंद्रांवर नीट 2026 पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 5 हजार 385 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेदरम्यान पेपरफुटी रोखण्यासाठी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर भिंतीवरील घड्याळ अनिवार्य करण्यात आले आहे.
दरम्यान, ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार असून, दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी 6.20 वाजेपर्यंत चालणार आहे. परीक्षेचे सुरळीत, पारदर्शक व गैरप्रकारमुक्त आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था यांच्या माध्यमातून आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 12 केंद्र अधीक्षक, 16 उपकेंद्र अधीक्षक, 16 निरीक्षक, 225 कक्ष निरीक्षक, 3 एनटीए प्रतिनिधी तथा भरारी पथके, 12 कर्तव्य दंडाधिकारी, 107 पोलीस कर्मचारी, 21 जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि 12 वाहनचालक यांचा समावेश आहे.
परीक्षेच्या दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, कर्तव्य दंडाधिकारी, निरीक्षक आणि भरारी पथकांमार्फत सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे.
परीक्षा केंद्रात अथवा परीक्षा कक्षात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, फिटनेस बँड, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, कॅमेरे, पेजर, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पर्स, हँडबॅग, पुस्तके, वह्या, नोट्स, छापील साहित्य, सैल कागदपत्रे, जिओमेट्री बॉक्स, लॉग टेबल, स्लाइड रूल, कोणतेही संप्रेषण साधन तसेच गैरप्रकारास मदत करणारे कोणतेही साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. उमेदवारांनी केवळ एनटीएने परवानगी दिलेल्या वस्तू, प्रवेशपत्र आणि वैध छायाचित्रयुक्त ओळखपत्र सोबत आणावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
फेरपरीक्षेसाठी वाढीव वेळ
फेरपरीक्षा वेळ दुपारी 2 ते 5.15 या वेळेत होणार आहे. उमेदवारांना 15 मिनिटे वाढवून देण्यात आला आहे. तर दिव्यांग उमेदवारांना 6:20 वाजेपर्यंतची वेळ दिली जाणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 1.20 या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. दुपारी 1.30 नंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. बायोमेट्रिक पडताळणीत तांत्रिक अडचण आल्यास लेखी हमीपत्र घेऊन प्रवेश देण्याची मुभा कायम ठेवण्यात आली आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परीक्षेवर देखरेख
फेरपरीक्षेबाबत एनटीएने प्रसिद्ध केल्या प्रसिद्धिपत्रकावर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (एनएमसी) बोधचिन्ह आणि नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेवर वैद्यकीय आयोगाची थेट देखरेख असल्याचे अधोरेखित होते. फेरपरीक्षेदरम्यान उमेदवारांना किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या शंका अथवा गैरप्रकारांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी एनटीएने नव्या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.




