Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : निष्ठेचा महामेरू

राज-का-रण : निष्ठेचा महामेरू

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

आजच्या अस्थिर, बेताल अन् बाजारू राजकारणात ‘उत्तम व्यवहार’ बाजूला राहून केवळ ‘पैशांचा व्यवहार’ सुरू आहे. सत्ता, संपत्ती आणि पदासाठी एका रात्रीत निष्ठा बदलणार्‍यांच्या भाऊगर्दीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी आमिषे झिडकारून पक्षनिष्ठेची घेतलेली भूमिका म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अभिमान वाटायला लावणारी ठरली तर नवल वाटू नये. नाशिकच्या जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले, त्या विश्वासाशी प्रतारणा न करण्याचा घेतलेला बाणेदार निर्णय हा त्यांच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीची प्रचिती देणारा आहे.

कांच मणी आणि हिरा | तो पां कळावे अंतरा ॥
तुका म्हणे घालू घोडे | ऐशा थोंड कशाचे तोडे ॥

काच आणि हिरा यातील फरक पारखणार्‍याला लगेच कळतो. प्रलोभनांचे ‘काच मणी’ कितीही चमकले, तरी निष्ठेचा ‘हिरा’ आपली किंमत आणि चकाकी कधीच सोडत नाही. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा एक निर्णय. वाजे यांनी मोठे आमिष झुगारून पक्षनिष्ठेचा असा काही आदर्श घालून दिलाय की सध्याच्या घाणेरड्या राजकारणात तो मैलाचा दगड ठरावा. प्रलोभनांचे हिरे नाकारण्याचीही हिंमत लागते. राजाभाऊंनी ही हिंमत गेले वर्षभर कमालीच्या संयमाने; पण तेवढ्याच कणखरतेने दाखविली.

आज ते या घटनांबद्दल फारसे बोलत नसले तरी त्यांना आपल्या गटात ओढण्यासाठी किती प्रयत्न झाले याची माहिती वेळोवेळी त्यांच्याशी बोलताना कळलेली होतीच. परंतु त्यांनी नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’सारख्या राजकीय घडामोडींमध्ये प्रलोभन नाकारून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा कायम ठेवली. महाराष्ट्राच्या बदलत्या आणि गढूळ राजकीय वातावरणात त्यांनी दाखवलेली ही तत्त्वनिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे. नाशिकच्या जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले, त्या जनतेच्या मतांशी आणि विश्वासाशी प्रतारणा न करण्याचा घेतलेला बाणेदार निर्णय हा त्यांच्या कार्यशैलीशी तंतोतंत जुळणारा आहे.

आमदार असतानाही त्यांनी नेहमी अधिकारी वा सरकारी कर्मचारीच नव्हे तर सामान्यांशीही नेहमीच आदरपूर्वक वर्तणूक केलेली आढळते. अलीकडच्या राजकारणात फिट्ट न बसणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे जेव्हा पाहिले जाते, तेव्हा अशा माणसाचा हेवाही वाटू लागतो. या पार्श्वभूमीवर ‘खोके’ आणि पक्षांतराच्या या गढूळ युगात आमची निष्ठा विकायची नाही (छेीं षेी डरश्रश) हा संदेश देत त्यांनी राजकारणात येऊ पाहणार्‍या व आलेल्या तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

खरे तर अलीकडेच नाशिकमध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत निष्ठेचा बाजार उठविणारे व विकले गेलेल्या मतदारांच्या रकमेचे आकडे ऐकल्यावर भोवळ यावी अशी स्थिती. त्याच नाशिकचे एक लोकप्रतिनिधी मात्र काही कोटींवर पाणी सोडून पक्षनिष्ठेचा आगळा आदर्श सहज उभा करून गेले. सत्यवचनी प्रभू रामचंद्रांच्या या पावनभूमीत असे दोन टोकाचे प्रसंग अनुभवास येणे हादेखील एक असाही योगायोग. कुरुक्षेत्रात कौरव व पांडवांच्या रूपाने सत्य-असत्याचा झालेला संघर्ष आपण ऐकत आलो आहोत. त्याचे लघुरूप म्हणून नाशिकच्या या दोन्ही प्रकरणांकडे पाहावे लागेल. विकला न जाणारा स्वाभिमान दाखवून राजाभाऊ वाजेंनी निष्ठेचा नवा दीपस्तंभ उभा केला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे|
उदास विचारे वेच करी॥

आजच्या बदलत्या राजकारणात ‘उत्तम व्यवहार’ बाजूला राहून केवळ ‘पैशांचा व्यवहार’ सुरू आहे. सत्ता, संपत्ती आणि पदासाठी एका रात्रीत निष्ठा बदलणार्‍यांच्या भाऊगर्दीत वाजे यांनी घेतलेली भूमिका म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अभिमान वाटायला लावणारी ठरली तर नवल वाटू नये. खरेतर यानिमित्ताने त्यांच्यावरील कौटुंबिक संस्काराचीही चर्चा व्हायला हवी. वडील प्रकाश वाजे यांनीही यापूर्वी शिवसेनेच्याच चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. परंतु त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी कधी त्याविषयी अवाक्षर काढले नाही.

अत्यंत स्पष्टवक्ते अन् शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. स्वाभिमानी व दिलेल्या शब्दाला जागणारे म्हणून त्यांचा लौकिक आहे. वाजे कुटुंबाने वैयक्तिक फायद्यापेक्षा पक्षाशी आणि ठाकरे घराण्याशी असलेल्या जुन्या नात्याला आणि निष्ठेला प्राधान्य दिले. ‘पैशाचे आमिष धुडकावून माझ्या मुलाने निष्ठेला महत्त्व दिले याचा मला सार्थ अभिमान आहे’, असे जाहीरपणे प्रकाशभाऊंनी सांगितले तेव्हा वडिलांच्या या प्रतिक्रियेमुळे भावनाविवश झालेले राजाभाऊ समस्त महाराष्ट्रवासीयांनी दूरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहिले. हे जे काही असते तो अंतर्मनातील भावनांचा नितळ प्रवाह असतो. त्यासाठी कसल्याच प्रदर्शनाची गरज नसते. राजाभाऊंनी हेच सत्व कायम जपले. आमदार झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हशी पिळायला शेतात जाणारे म्हणून तेव्हाही राष्ट्रीय माध्यमांनी त्यांची दखल घेतली होती. आजही खासदार झाले तरी ते तसेच व तेवढेच साधे आहेत. कसलाच बडेजाव नाही.

धन्य तयाचा आचार|
जो हा विसरू न पावे॥
सत्य बोलणे संतांसी|
काय तयासी वाण वाहे॥

संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा आचार शुद्ध आहे आणि जो सत्याची व निष्ठेची कास धरतो, तोच खर्‍या अर्थाने वंदनीय ठरतो. राजाभाऊंनी त्याच धर्तीवर केवळ राजकीय पवित्रा घेतला नाही, तर त्यांनी नाशिकच्या ज्या जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला, त्या मतदारांशी आणि ज्या ठाकरे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा ‘आचार’ पाळला. आजकालच्या राजकारणात जेव्हा तत्त्वे आणि निष्ठा गहाण ठेवली जातात, तेव्हा संत कबीरांचा एक दोहा आठवतो,

कबीरा खड़ा बज़ार में, माँगे सबकी खैर|
ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर॥

पण या बाजारात जेव्हा ‘माणसे आणि त्यांच्या निष्ठा’ विकल्या जाऊ लागतात, तेव्हा राजाभाऊंसारखा नेता ताठ कण्याने उभा राहून सांगतो, आम्ही विकले जाणार्‍यांपैकी नाही! राजाभाऊ वाजे यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेतच अधिक घडली आहे. २०२२ च्या मोठ्या बंडानंतरही ते डगमगले नव्हते आणि आजही जेव्हा पुन्हा एकदा वादळ घोंगावत आहे, तेव्हाही ते आपल्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या या निर्णयामागे त्यांचे वडील प्रकाश वाजे यांचे संस्कार आणि वाजे कुटुंबाची जुनी वैचारिक बैठक आहे. म्हणूनच दिल्लीतील घडामोडींनंतर जेव्हा ते नाशिकमध्ये परतले, तेव्हा शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे केलेले ऐतिहासिक स्वागत, ही त्यांच्या याच निष्ठेची जनमानसातील पावती होती. राजाभाऊंनी राजकारणातील ‘व्यंकटी’ (वाकडेपणा किंवा स्वार्थीपणा) बाजूला सारून ‘सत्कर्माची’ आणि सुसंस्कृत राजकारणाची वाट निवडली आहे. त्यांनी दाखवून दिले की, सत्तेपेक्षा आणि पैशांपेक्षा ‘शब्द’ आणि ‘विश्वास’ मोठा असतो. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील निष्ठावंतांना बळ देणारा आणि लोकशाहीवरचा विश्वास दृढ करणारा ठरेल, यात शंका नाही.

दिलीप खैरेंच्या निष्ठेची पावती
राजाभाऊ वाजेंच्या निष्ठेच्या गोष्टींनी सध्या सगळे नाशिककर मुग्ध झालेले असतानाच राजकारणातील इतरही काही निष्ठावानांचीही आठवण होणे स्वाभाविक. शिवसेनेच्याच ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनीही गेल्या काही वर्षांत अनेक निमंत्रणांना नकार देत ठाकरेंशीच एकनिष्ठ राहणे पसंत केले. गेल्या वर्षी नाशिकची सर्वच शिवसेना शिंदे व भाजपच्या कच्छपी लागली असताना दत्ता गायकवाड, वसंत गिते, जयंत दिंडे आदी मोजके पदाधिकारी निष्ठेने ठाकरेंची मशाल विझणार नाही याची काळजी घेत राहिले. अशा या गायकवाड यांच्या चिरंजीवांना महापालिकेत स्वीकृत नगरसेवक करणार अशी आवई उठल्यानंतर याच राहिलेल्या सेनेतील काहींनी गायकवाड यांच्यावर अश्लाघ्य टीका केली होती. त्यावरही गायकवाड शांत राहिले हीच त्यांच्या निष्ठेची खरी पावती.

याच माळेत आता आणखी एक नाव घेता येईल ते म्हणजे दिलीप खैरे यांचे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली. मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक ही तर त्यांची ओळख आहेच; पण भुजबळांशी गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ निष्ठा ठेवणारे कदाचित ते एकमेव असावेत. पितृछत्र लहानपणीच हरविल्यानंतर त्यांनी रिक्षा चालविण्यापासून, ट्रक लिनर ते चहाची टपरी चालविण्यापर्यंत अनेक उद्योग करून प्रपंच चालविला. अत्यंत सामान्य कार्यकर्ते असल्यापासूनच त्यांनी भुजबळांचे बोट धरले ते कठीण काळातही सोडले नाही. भुजबळ कुटुंबीयांवर मध्यंतरी बालंट आले, साहेब व समीर अशा दोघांनाही अटक झाली, प्रदीर्घ काळ कोठडीत काढावा लागला. या सर्व परिस्थितीत अनेक लाभार्थींनी भुजबळांपासून जे अंतर राखले ते नंतरही तसेच ठेवले.

पण दिलीप खैरे मात्र या काळातही सावलीसारखे भुजबळांच्या पाठीशी राहिले. भुजबळांच्या सर्वच संकटकाळात ते आक्रमकपणे पुढे होते. दरम्यान, समीर, पंकज या कुटुंबातील सदस्यांना काही ना काही मिळत असताना दिलीप यांना मात्र निष्ठावान या नामाभिधानापलीकडे फार काही मिळाले नव्हते. अनेकदा तर पक्षातीलच लोकांनी तक्रार केल्यानंतर बाजूलाही व्हावे लागले. तेव्हा भुजबळ ब्रिगेड व समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इतर मागासवर्गीयांच्या संघटनाचे काम केले. भुजबळांना पुन्हा चांगले दिवस आल्यानंतर खैरे यांनी येवला मतदारसंघात काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना काहीतरी मिळणार असे बोलले जाऊ लागले. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने कात्रजचा घाट दाखविल्यानंतर साहेबांचे काम करण्याशिवाय त्यांच्याकडेही पर्याय राहिला नाही. विविध शासकीय समित्यांवरही खैरेंची कधी वर्णी न लागल्याने अनेकदा त्याविषयी चर्चाही व्हायची. पण दिलीप खैरे यांनी त्याविषयी कधीच चकार शब्द काढला नाही. साहेब न्याय देतील अशीच त्यांची भावना राहिली.

आता रवींद्र पगार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर त्यांची निवड झाल्यामुळे त्यांना न्याय मिळाला असे म्हणता येते. त्यांच्या संघटन कौशल्याची आता कसोटी लागेल. यापूर्वी हे पद रवींद्र पगार यांनी दीर्घकाळ भूषविले. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी मोठ्या हिकमतीने पदाला न्याय दिला. पक्षात जिल्हाभरात अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नेते, आमदार, खासदार असताना सर्वांना पक्षाच्या शिस्तीत ठेवणे ही अवघड जबाबदारी शेटेंनी सुरुवातीच्या काळात पार पाडली. नंतर पगार यांच्याकडे ती जबाबदारी आली. पुढे तर कोणीही हे पदच घ्यायला तयार नसल्याने पगार यांना काम करीतच राहावे लागले. पगार यांची भुजबळांशी असलेली सलगी हा तेव्हा भुजबळ विरोधकांचा आक्षेप असायचा. आता तर भुजबळांचा खास माणूसच जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षातील हा गट कशा प्रतिक्रिया देतो ते पाहावयाचे. मराठा व ओबीसी या छुप्या संघर्षाच्या पार्श्वभूमीच्या दृष्टीने खैरे यांची कसोटी आहे.

पूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले असल्याने त्यांना पक्षांतर्गत गटबाजी तशी नवी नाही. पण तरीही पक्षातील सर्वच गटातटांना सांभाळून पुढे जावे लागेल. अशातच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे शिवधनुष्य त्यांना पेलायचे आहे. उमेदवारी वाटपापासूनच संघर्षाची ठिणगी पडायला सुरुवात होईल. त्यामुळेच खैरे यांना कमालीच्या सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. सामान्य पण हाडाच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. दिलीप खैरे यांच्या कारकीर्दीला शुभेच्छा..
मो. ९३२५३ ८३०९२

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....