
मुंबई | Mumbai
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो आंदोलकांसह मुंबईच्या आझाद मैदान परिसरात आंदोलनासाठी बसले आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने आले आहे. या आंदोलनाचा फटका मुंबईला बसला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. गेल्या दहा वर्षात आमचे सरकार असतानाच मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिले. त्या आधीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजासाठी काहीही केले नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लागावे अशी ठाकरे-पवारांची इच्छा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणसाठी आंदोलन सुरू आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. ते ठाम भूमिका घेत नाहीत. तुमची कायदेशीर भूमिका काय आहे ते सांगा. ते समाजासमाजात भांडण लावत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत असे फडणवीस म्हणाले.
जरांगेंनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज सकाळी आंदोलक मुंबईत आले. मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचे प्रकार घडले. मात्र पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शासनाचीही सहकार्याची भूमिका आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन होत असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.
वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणात झाली
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, वाहने काढून जागा मोकळ्या केल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं आल्यानंतर वाहतूक कोंडी होतेच. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या सगळ्यामध्ये एका गोष्टीची खबरदारी घ्यावी लागेल. काही लोकच वेगळ्या पद्धतीने वागतात त्यामुळे संपूर्ण आंदोलानाला गालबोट लागते. त्यामुळे कुणी असे वागू नये याकडे लक्ष द्यावेत. मनोज जरंगे पाटील यांनी देखील अशाच पद्धतीने आवाहन केले आहे की कुणीही असे वागू नये.’
अलोकतांत्रिक आणि आडमुठे पद्धतीने वागू नये
“उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सरकार सर्व काही मदत देईल. मनोज जरांगे पाटील यांनीही अलोकतांत्रिक आणि आडमुठे पद्धतीने वागू नये, असे आवाहन केलेले आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत अशी इच्छा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत अशी आपली इच्छा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये, या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्हीच केलेय. या समाजात उद्योगासाठी मदत केली आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या योजना राबवल्या आहेत. मराठा समाजासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत.”
काही लोक जाणीवपूर्वक समाज एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करत आहे
काही लोक जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी तसे करू नये, नाहीतर त्यांचे तोंड भाजेल. एकाला समोर करायचे, दुसऱ्याला नाराज करायचे. नंतर त्याला पुन्हा समोर करायचे. एकमेकांमध्ये लढवायचे हे काम काही लोकांचे सुरू आहे असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




