Saturday, September 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड - राजयोगी ब्रह्माकुमार गिरीश...

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार गिरीश भाईजी

‘देशदूत’च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष व्याख्यान

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात करा. देण्यातच खरा आनंद, आत्मिक सुख आणि समाधान दडलेले आहे. आनंद हा बाहेर शोधण्याची गोष्ट नसून तो आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात दडलेला आहे. हाच जीवनातील ‘खुशी का पासवर्ड’ आहे, असे प्रतिपादन राजयोगी ब्रह्माकुमार गिरीश भाईजी यांनी केले.

दैनिक ‘देशदूत’च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत आनंदी जीवनाचे विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या आणि विनोदी शैलीतील मार्गदर्शनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गिरीश भाईजी म्हणाले, आपण आनंद बाहेर शोधत असतो. पैसा, प्रतिष्ठा, सुविधा, पद किंवा इतरांकडून मिळणारे कौतुक यावर आपला आनंद अवलंबून ठेवतो. मात्र आनंदाची खरी चावी आपल्या विचारांमध्ये आहे. परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलण्यापेक्षा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तर जीवनाकडे सकारात्मकतेने पाहता येते. त्यामुळे परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. हास्याचे महत्त्व विशद करताना भाईजी यांनी सांगितले की, माणूस फक्त हसण्यानेही सुंदर दिसू शकतो. माणसाला सुंदर बनवण्याचे रहस्य हास्यातच आहे. परदेशात झालेल्या संशोधनानुसार लहान मुले दिवसातून मोठ्या प्रमाणात हसतात; मात्र माणूस मोठा होत जातो तसतसा तो प्रपंच, चिंता आणि जबाबदार्‍यांमध्ये अडकतो आणि हसणे विसरतो.

हास्याचे महत्त्व सांगताना त्यांनी गंमतीदार उदाहरणे देत उपस्थितांना खळखळून हसवले. जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खुशी के लिए और खुशी के साथ जीना चाहिए, असा संदेशही त्यांनी दिला.पैसा जीवनासाठी आवश्यक आहे. मात्र केवळ पैसा कमावून उपयोग नाही. पैशासोबत खुशी, शांती आणि आनंदही कमवा. जीवनात भौतिक संपत्तीबरोबरच आत्मिक संपत्ती मिळवणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

राग, द्वेष, मत्सर, चिंता आणि अवाजवी अपेक्षा यामुळे मनाची ऊर्जा कमी होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीबद्दल शुभभावना ठेवणे, क्षमा करणे, स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि वर्तमान क्षणाचा आनंद घेणे आवश्यक आहे, असे भाईजी यांनी सांगितले.आपल्या मनाचा रिमोट दुसर्‍याच्या हातात देऊ नका. कोणीतरी काही बोलले, काही केले किंवा आपल्याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही म्हणून आपला आनंद हिरावून घेण्याचा अधिकार आपण दुसर्‍याला देऊ नये. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले, तर आपल्या भावनांवरही नियंत्रण ठेवता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आनंदी जीवनाचा संदेश
व्याख्यानाच्या समारोपात त्यांनी उपस्थितांना आनंदी जीवनाचा सुंदर गुरुमंत्र दिला –
छूले आसमा,
जमीन की तलाश ना कर,
जी ले जिंदगी,
खुशियों की तलाश ना कर,
तेरी तकदीर खुद बदल जायेगी,
बस खुश रहना सीख ले,
वजह की तलाश ना कर.

या संदेशातून त्यांनी परिस्थिती, अडचणी आणि बाह्य कारणांमध्ये आनंद शोधण्याऐवजी स्वतःच्या अंतर्मनात आनंद निर्माण करण्याचे आवाहन केले.

देण्यातच खरा आनंद
जीवनात केवळ मिळविण्याच्या मागे न धावता देण्याची वृत्ती विकसित करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, मला सर्व काही मिळाले पाहिजे, ही भावना आपल्याला अस्वस्थ करते. त्याऐवजी आपण इतरांना काय देऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे. एखाद्याला मदत करणे, प्रेम देणे, सन्मान देणे, एखाद्याचे मनोबल वाढविणे किंवा एखाद्याच्या चेहर्‍यावर हास्य आणणे, हीदेखील मोठी संपत्ती आहे. आनंद हा एखादी गोष्ट मिळाल्यानंतर मिळणारा परिणाम नसून तो आपल्या जगण्याचा स्वभाव बनला पाहिजे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले, तर त्यातून समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.

रॉयल भिकारी होऊ नका
आज प्रत्येकाला प्रेम, सन्मान आणि आदर हवा आहे. मात्र या अपेक्षांवर आपला आनंद अवलंबून राहिल्याने आपण इतरांकडून सतत काहीतरी मागत असतो. त्यामुळे माणूस र्रॉयल भिकारी’ बनला असल्याचे मार्मिक भाष्य भाईजी यांनी केले. मोबाईलच्या अतिवापराबाबतही त्यांनी उपस्थितांना सावध केले. मोबाईलचा मर्यादित वापर माहिती मिळविण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहे. मात्र मोबाईलवरच अवलंबून राहणे योग्य नाही. तंत्रज्ञानाचा वापर आपण करायला हवा; तंत्रज्ञानाने आपला वापर होऊ देता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

माझ्या दुःखाचे कारण मीच
‘मेरी खुशी का पासवर्ड मेरी मर्जी है’ असे सांगत भाईजी यांनी आनंदाची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याचा संदेश दिला. माझ्या जीवनातील माझ्या दुःखाचे कारण मीच आहे, हे स्वीकारण्याची तयारी झाली पाहिजे. दुसर्‍याला दोष देण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. शांती ही शक्ती आहे. मन शांत असेल तर कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

0
पुणे (प्रतीनिधी) कुराश खेळात प्रावीण्य मिळवल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करून क्रीडा कोट्यातील पाच टक्के आरक्षणाचा लाभ घेत सरकारी नोकऱ्या मिळविल्याचा प्रकार पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...