मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांकडून, सत्ताधारी आमदारांकडून प्रवासासाठी ई वाहनांचा वापर करण्यात येत आहे. तर काही मंत्री जवळ कुठेही जाण्याकरिता पायीच चालत निघाल्याचेही पाहायला मिळत आहे. अशातच आज गुरुवारी (ता. 14 मे) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट बुलेट ३५० वरुन विधान भवनात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या मागे बसून मंत्री आशिष शेलार यांनीही बाईकवरून विधान भवन गाठल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा देखील केली. ते म्हणाले की, “पंतप्रधानांनी जे काही निर्देश दिले आहेत ते देशहिताकरिता आहेत. त्यामुळे आपापल्या परीने जे जे करता येईल त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. राज्यातले नेते मंडळी जेव्हा अशा प्रकारे प्रचार करतात, ते लोकांपर्यंत पोहोचते म्हणून मी आज मोटार सायकलने आलेलो आहे. आमचा ताफा देखील कमी केलेला आहे. सर्वांचा परदेशातील प्रवास देखील आम्ही रद्द केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कसे करता येईल, तसेच परकीय चलन बचत कशी करता येईल? हा आमचा प्रयत्न असेल.”
या पुढे शासकीय आयोजन पुढील सहा महिने करणार नाही
यावेळी त्यांनी शुक्रवारी (ता. 15 मे) साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमाबाबत म्हटले की, राज्यातील शासकीय आयोजन पुढील सहा महिने करण्यात येणार नाही. परंतु, शुक्रवारी साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमाचे आधीच आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता पैसाही खर्च करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून २५ लाख कुटुंबांना १० हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेकरिता देण्यात येणार आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून खूप आधीपासून हा कार्यक्रम आयोजित होता, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही
पंतप्रधानांच्या आवाहनावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगातील सर्व देश याहीपेक्षा कठोर निर्णय घेत आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी आपल्याला केवळ थोडासा त्याग करायला सांगितला आहे. कुठलेही कठोर निर्णय घेण्यात आलेले नाहीत. त्यावर इतका गदारोळ उभे करणे योग्य नाही. यापूर्वी इंदिरा गांधी असताना असे झालेले आहे. चिदंबरम यांनीदेखील २०१२ साली अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. त्यामुळे असे वागणे योग्य नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी तयार झाल्यामुळे देश हितासाठी आपण थोडेही जुळवून घ्यायला तयार नसलो तर विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही, असेच म्हणावे लागेल.”
यापेक्षा जास्त मूर्खपणाचे लक्षणच असू शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15 मे पासून 4 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. याच टीकेला आता मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले आहे. त्यांनी यााबबत म्हटले की, देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, यापेक्षा जास्त मूर्खपणाचे लक्षणच असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, तेव्हा स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. पंतप्रधानांनी सांगताना जे काही विदेश प्रवास करू नये असे म्हटले आहे, ते अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे आहे. याचा अर्थ असा नाही की, आपला कोणी व्यापारी परदेशात एक मोठी डील करत असेल तर त्यांनी ती डीलच रद्द करून टाकावी. जे अशा प्रकारचे टीका करत आहेत ते बिनडोकच आहेत, अशी जहरी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.




