मुंबई | Mumbai
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कथित ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या फॉरेन्सिक आणि सायबर तपासणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने २२ ऑक्टोबर रोजी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या क्लिपमधील आवाजांची ओळख, संभाषणाचा कालावधी आणि त्यात फेरफार करण्यात आला आहे का, याची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या प्रकरणाची फॉरेन्सिक आणि सायबर सेलमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे सचिव राहुल शेवाळे यांनी दिली.
जरांगे यांनी ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मनोज जरांगे आणि शिवसेना शिंदे गटाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अनेक बँकांत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
अडीच वर्षांनंतर क्लिप बाहेर येण्यामागे हेतू काय?
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जे काही संभाषण किंवा ऑडिओ क्लिप समोर आली आहे, तिची पूर्ण फॉरेन्सिक चौकशी केली जाईल. यासंदर्भात जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त करण्यात आले आहे. मात्र, तब्बल अडीच वर्षांनंतर हे संभाषण बाहेर येण्यामागे नेमका काय हेतू आहे? कोणाला आणि कशासाठी टार्गेट केले जात आहे? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
दूध का दूध, पाणी का पाणी होणार!
मनोज जरांगे पाटील तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या मागणीची गंभीर दखल घेत सरकारने चौकशीचे संकेत दिले आहेत. “या प्रकरणाची निष्पक्ष आणि पूर्ण चौकशी करून यामागील जे काही सत्य असेल ते आम्ही जनतेसमोर आणू,” असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी राजकीय डाव
सायबर सेल, फॉरेन्सिक लॅबमध्येही याचा तपास होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. यामागे राजकीय षडयंत्र असून त्यातून महायुतीच्या नेत्यांमध्ये तेढ निर्माण व्हावेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा राजकीय डाव आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर जे काही सत्य असेल ते समोर येईल असं विधान माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली.




