मुंबई | Mumbai
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “५०० कोटी रुपयांचा प्रश्न नाही, तर हे सगळं नियोजन कसं केलं जात आहे, हा खरा प्रश्न आहे,” असे म्हणत त्यांनी जरांगे यांना बदनाम करण्याच्या कथित प्रयत्नांवर सवाल उपस्थित केले.
कशा प्रकारचं प्लॅनिंग चालतं
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, तो प्रश्न ५०० कोटींचा नाहीये, प्रश्ना असा आहे की कशा प्रकारचं प्लॅनिंग चालतं आणि या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला पण धरलंय. कळलं का? मग कोण रिपोर्ट छापू शकतं आणि कोण रिपोर्ट छापू शकत नाही आणि छापलं नाही तर आम्ही काय करू, त्याच्यामध्ये ही पत्रकारांना पण दिलेली एक धमकी आहे. मला असं वाटतं, याचंही भान तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. प्रिंट असेल किंवा चॅनलमध्ये असं बोलले नसतील ते, पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, प्रिंट आहे का चॅनल, हा विषय नाही, पण प्रश्न त्यातला गंभीर असा आहे की कशाप्रकारचे नरेटिव्ह पसरवले जाते, कशाप्रकारचं हे प्लॅनिंग करतायत, कशाप्रकारे एका माणसाला बदनाम करतायत, असंही राज ठाकरे म्हणाले.
क्लिपमध्ये बोलणारे लोक आम्हालाही माहिती आहे
तर आता जरांगे पाटलांसारखा माणूस, आरक्षण मिळेल, न मिळेल, हा सगळा नंतरचा भाग झाला, पण एखाद्या माणूस त्याला तुम्ही बरोबर घ्यायचा आणि नंतर बदनाम करायचा आणि त्याच्यानंतर त्याचीच माणसं कशी फोडायची आणि मग ती लोक सगळ्या याच्यामध्ये जरांगेच्या विरोधात बोलतील. जरांगे पाटलांच्या विरोधात काय चाललंय काय? म्हणजे हे यांचं फक्त इथे बसून सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग चाललं ”क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके आहेत कोण, हे आम्हालाही माहिती आहे. या लोकांनी गोष्टींचा नीट विचार करावा, कारण उद्या जेव्हा यांची सत्ता जाईल, तेव्हा कोणकोणत्या गोष्टी अंगाशी येतील, याचा अंदाजच नाहीये. महत्त्वाचा प्रश्नय की, ही क्लिप आली कुठून?” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भूमिका मांडली.
दिवाळीनंतर दुष्काळी भागाचा दौरा करणार
दिवाळीनंतर राज ठाकरे दुष्काळी भागाचा दौरा करून पाणी टंचाईचा आढावा घेणार आहेत. आज मनसे पदाधिकाऱ्याच्या बैठकीनंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती असताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारने दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीने काहीही होणार नाही. मराठवाड्यात पाण्याचे नियोजन नीट केले नाही तर तिथे वाळवंट होण्याची शक्यता आहे, याबद्दल मी आधीपासून बोलत आलो आहे. पण याचा विचार केला जात नाही.
मराठवाड्यात पाण्याचे नियोजन केले जात नाही. अवैधरीत्या बोर खणल्या जात आहेत. बिअरच्या कारखान्यांना परवाने दिले जात आहेत. टॅप वॉटरचे पाणी विकले जात आहे. विहिरीतून पाण्याचा उपसा अवैध कामासाठी सुरू आहे, अशी माहिती देताना राज ठाकरे यांनी याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे आवाहन केले.
कुंभमेळ्याचं काय? या सगळ्या गोष्टींचा धार्मिक गोष्टींचा विचार केला पाहिजे, बरं का? आणि आता खरी गरज ही पिण्याच्या पाण्याची आहे, शेतीच्या पाण्याची आहे, हे संकट अजून वाढत जाणार आहे, हे आता ही सगळी सुरुवात आहे. आता नुसतं पाणी टंचाईचं होणार नाहीये, तर साधारणपणे अन्नधान्याची टंचाई पण पुढे सुरू होईल. पुढच्या काही महिन्याभरामध्ये, महिना दीड महिन्यामध्ये महाराष्ट्रातनं तांड्याचे तांडे लोकांचे बाहेर पडतील आणि शहराकडे वळतील. घरदार सोडून लोक बाहेर पडतील आणि आज तिथला जनावरांचा प्रश्न पण खूप मोठा आहे, बरं का, गुरा-ढोरांचा प्रश्न खूप मोठा आहे,असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.




