सिन्नर |प्रतिनिधी | Sinnar
सिन्नरला पहिल्यांदाच भाजपा पूर्ण ताकदीने निवडणूकीला उभी असून आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात, जात ही आमची…. असे म्हणत आमचा डीएनए विचारण्याची हिम्मत करु नका असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता दिला.
नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत वाजे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर संपर्कमंत्री गिरीश महाजन, आ. राहूल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, भारत कोकाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. मी संपूर्ण राज्यभर निवडणूक प्रचारासाठी दररोज 6-7 सभा घेत आहे. मात्र, मी कुणावरही टिका करत नाही. ज्याच्या जवळ बोलायला काही नसते, ते टीका करतात. आमच्याकडे व्हीजन आहे. निधी आहे आम्ही जे बोलतो ते करतो. देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.
उलट राज्यातील 50 लाख लाड्नया बहिणींना यापूर्वीच आम्ही लखपती दीदी बनवले आहे. पूढच्या वर्षभरात हा आकडा दीड कोटीवर जाणार असून या लखपती दीदींमध्ये सिन्नरच्याही दीदी यायला हव्यात असे ते म्हणाले. स्वातंत्र्यापासून 60-65 वर्षात सत्ताधाऱ्यांनी छोट्या गावांचा विकास म्हणजेच देशाचा विकास मानले. मात्र, शहरांचा त्यांना विसर पडला. अन्न-वस्त्र, निवारा, शिक्षणासाठी गावातून लोक शहरात आले. त्यातून झोपडपट्ट्या वाढल्या. शहराची लोकसंख्या वाढली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कचरा वाढला. मात्र, शहराकडे कुणीही पाहिले नाही. राज्याच्या लोकसंख्येपैकी 50% म्हणजेच साडेसहा कोटी लोक राज्यातील 40 हजार गावांमध्ये रहातात. तेवढेच साडेसहा कोटी लोक 400 शहरांमध्ये रहातात.
शहरांचा विकास केल्यास अर्ध्या महाराष्ट्रचं जीवनमान आपण उंचाऊ शकतो ही बाब पहिल्यांदा पंतप्रधान मोदींनी जाणली आणि शहरांमध्ये पायाभूत सुविधांसाठी स्मार्ट सिटी, अमृत, स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास योजना यासारख्या अनेक योजना सुरु केल्या. त्यासाठी हजारो कोटींचा निधी शहरांना, राज्यांना दिला. एकट्या अमृत योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला 50 हजार कोटी मिळाले. पिण्याच्या पाण्याची योजना त्यातून करण्यात आल्या. घन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी निधी दिला. कचऱ्यापासून खत, गॅस, विजनिर्मिती केली. त्यामूळेच शहरांमध्ये असणारा कचरा आता वेस्ट राहिलेला नाही. प्रत्येकाला पंतप्रधान आवास योजनेतून घर द्यायचे आहे. त्यासाठी पैसाही आहे.
मात्र, प्लॉटचे नियमितीकरण करता येत नाही. म्हणून दोनच महिण्यांपूर्वी राज्य शासनाने अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिक्रमण धारकाच्या नावावर मालकी ह्नकाचा पट्टा लागणार असून त्यांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये शासन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेमंत वाजे यांनी शहराच्या विकासासाठी अनेक योजनांची माहिती दिली. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पहिल्याच आठवड्यात मुंबईला या. तुमच्या सर्व योजनांना मंजूरी देतो असे आश्वासन ना. फडणवीस यांनी हेमंत वाजे यांना दिले. तुमच्या मागे मी आहे. महाजनांसारखे मंत्री आहेत. संपूर्ण सरकार पाठीमागे आहे. त्यामूळे चिंता करु नका अशी ग्वाही त्यांनी दिली. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून लवकरच काम सुरु होणार असून त्यातून सिन्नर तालुका सुजलाम्, सुफलाम् केल्याशिवाय राज्य सरकार राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला.
सिन्नरमध्ये छुपी युती ?
राज्यात भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. मात्र, आपल्या सरकारचे मंत्री सिन्नरमध्ये दुसऱ्या पक्षासोबत छुपी युती करत असल्याचा आरोप उदय सांगळे यांनी क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता केला. सभेत बोलताना त्यांचा अर्धा वेळ माझ्यावर टिका करण्यातच जातो. त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत टिका केली तर चालेल मात्र, त्यांनी माझ्या पक्षावर टिका करणे त्यांना शोभनीय नाही. भाजपा हा बाटलेला पक्ष नसून जनतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे सांगळे म्हणाले. भाजपा फोडाफोडीचे राजकारण करत नाही. कोकाटे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे असे आरोप करत असल्याचे ते म्हणाले. आमचा डीएनए इत्नया पण खालच्या पातळीचा नाही की तो काळ्या आईची सेवा करणाऱ्यांना भिकारी म्हणणारा नाही. जनतेने तुम्हाला त्यांचे प्रश्न मांडायला विधीमंडळात पाठवले. मात्र, तुम्ही तिकडे रम्मी खेळता. जनतेसाठी समर्पक भावनेने काम करणारा आमचा डीएनए असून तुमचा आणि आमचा डीएनए कधीही एक होऊ होऊ शकत नाही, असा टोला सांगळे यांनी मारला. हेमंत वाजे यांच्यासारखा सुसंस्कृत, अभ्यासू व निष्कलंक, लोकाभिमुक उमेदवार आपण नगराध्यक्ष पदासाठी दिला असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा परिस स्पर्श दिल्यास शहरासह तालु्नयाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना सांगळे यांनी व्यक्त केली.
कुंभमेळ्याचे प्रवेशद्वार म्हणून सिन्नरकडे बघतोय
सिन्नर तालु्नयातून समृद्धी महामार्ग, सुरत-चैन्नई महामार्गासारखे मोठे प्रकल्प जात आहेत. या तालु्नयाला मोठा इतिहास असून विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून सिन्नर विकसित होत आहे. त्यामुळे आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमिवर सिन्नरचा विकास होणे महत्वाचे आहे. कुंभमेळ्यासाठी हजारो भाविक व पर्यटक सिन्नरच्या दिशेनेच नाशिकला येणार आहेत. त्यामुळे सिन्नरकड आम्ही कुंभमेळ्याचे प्रवेशद्वार म्हणून बघत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निधीतून सिन्नरलाही रस्त्यांसह इतर कामांसाठी निधी देण्याचा आमचा विचार असल्याचे ते म्हणाले. सिन्नरचा इंडिया बुल्सचा प्रकल्प विक्रीला निघाला तेव्हा अनेक खाजगी लोक त्यासाठी बोली लावायला आले होते. मात्र, विज मंत्री म्हणून मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि सर्वात जास्त बोली महाराष्ट्र सरकारने लावून हा प्रकल्प विकत घेतला असल्याचे ते म्हणाले. लवकरच या प्रकल्पात वीजेचे उत्पादन सुरु होईल, असा शब्दही त्यांनी दिला.
वाजे यांनी वेधले मागण्यांकडे लक्ष
सिन्नर शहराच्या कडवावरील पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रूटी आहेत. दोन्ही बाजूला असणाऱ्या एमआयडीसीमूळे शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामूळे दारणा नदीवरील जूनी योजना पून्हा कार्यान्वित करण्याची गरज आहे. ही योजना कार्यान्वित करुन द्यावी असे साकडे हेमंत वाजे यांनी मुख्यमंत्र्यांना घातले. शहरातील सर्व गटारी भुमीगत करण्याचा डीपीआर मान्यतेसाठी शासनाकडे आला आहे. त्यास त्वरीत मंजूरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. शहरातील अतिक्रमीत घरांसाठी योजना राबवावी. घरपट्टीवरील व्यास व शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यास मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. सिन्नर शहरात शिवसृष्टी उभी करण्याचा मनोदय वाजे यांनी व्यक्त केला.




