मुंबई | Mumbai
कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरुन एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागेत आरएसएसच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र असलेले प्रियांक खरगे यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवून सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक संस्थांशी संबंधित ठिकाणी संघाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रियांक खरगेंचे वक्तव्य हे प्रसिद्धीसाठी असल्याचे म्हटले आहे.
प्रियांक खरगे यांनी पत्रात नेमकं काय म्हंटले आहे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांमध्ये शाखा आणि बैठका आयोजित करून मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये फूट पाडणारे विचार पसरवत असल्याचे मंत्री प्रियांक खरगे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना संविधानाच्या तत्वांविरुद्ध काम करतोय आणि तिचे कार्यकर्ते मुले आणि तरुणांमध्ये अशांतता पसरवत आहेत, ज्यामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येत असल्याचे प्रियांक खरगे यांनी म्हटले. प्रियांक खरगे यांच्या पत्रानंतर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रियांक खर्गे पुढे पत्रात म्हणाले, “शासकीय शाळा, सरकारमान्यताप्राप्त शाळा व सार्वजनिक ठिकाणी आरएसएशकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनांवर जसे की त्यांच्या शाखा, बैठका, सांघिक व परेडवर पूर्णपणे बंदी घालावी.”
देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर यापूर्वीही बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर इंदिरा गांधींना पद सोडावे लागले होते असे म्हटले आहे, याबरोबरच त्यांनी प्रियांक खरगे यांच्यावर टीका देखील केली आहे. प्रियांक खरगे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कर्नाटकचे हे प्रियांक खरगे आहेत, हे प्रसिद्धीकरिता असल्या गोष्टी करत असतात. त्यांना काहीच स्टँडिंग नाही. ते वडिलांच्या भरवशावर राजकारण करणारे आहेत. त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, नव्हे बंदी घातली. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावे लागले,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. देशभक्त संघटन आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मुल्याधिष्ठीत अशा मानवनिर्मितीचे कार्य संघ करते. प्रसिद्धिसाठी अशा प्रकारचे पत्र देतात त्याकडे आम्ही ढुंकूनही पाहात नाहीत.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





